“तूं वाटे हिस्सेच बोलू लागलास.”
“केव्हा तरी होणारच आहेत ते. आणि तुमची कसाबकरणी मला थोडीच पसंत पडणार आहे?”
“तूं कर्णाचा अवतार हो.”
“देवाची इच्छा असेल तर होईन.”
“तू जेव.”
“घर नाही ना जप्त करणार?”
“नाही.”
“आईच्या पायांची शपथ घे.”
“सांगितले ना नाही करणार म्हणून!”
“जगन्नाथ, विश्वास ठेव.” आई म्हणाली. जगन्नाथ जेवला. आई त्याच्याबरोबर जेवली. परंतु त्या दिवसापासून घरांत जरा अशांतिच निर्माण झाली. अबोले जन्माला आले. घरांत जणुं सारे मौन बनले होते.
“गुणा, आज मध्यरात्री आपण जायचे येथून.” रामराव म्हणाले.
“परंतु जगन्नाथ म्हणतो की जप्ती येणार नाही, लिलाव होणार नाही.”
“सावकारी पाश गुंतागुंतीचा असतो. दुस-या सावकारांकडून ते फिर्यादी देववितील, लिलाव पुकारतील व लिलावांत स्वत: विकत घेतील. नकोच येथे राहणे. करोत आपल्या पाठीमागे वाटेल ते. आपण आज जाऊ. तुझ्या मित्राला भेटून ये. परंतु सांगू नको. आपण जणुं अज्ञातवासात जाऊं. ईश्वराची इच्छा असेल तर परत येऊ हो बाळ.”