“महाराष्ट्री रंगाचे बाळ. गो-या रामाचें बाळ.” ती डोळे मिटून पडून राही. जगन्नाथच्या मांडीवर हात ठेवून पडून राही. मध्येंच हात वर करून त्याची मान खाली वांकवी व तोंडावर धरून ठेवी त्याचें तोंड.

“जगन्नाथ, फार दिवस आपण नाही हो राहणार. तुझें हे गोड तोंड फार दिवस नाही हो मी पाहणार. म्हणून हो तें धरून ठेवावेंसें वाटतें. तुला हृदयांत कोंडून ठेवावेसे वाटतें. कशाल तूं दक्षिणेंत आलास ? मी हिंदीप्रचारक करीत होतें. हरिजनसेवा करीत होतें. त्या अहंकारांत होतें. सेवेच्या व वैराग्याच्या अहंकारांत होते. तूं आलास दक्षिण दिग्विजय करायला. कावेरीला वेड लावायला. मला भिकारी बनविलेंस. तूं भिकारी झालास.”

जगन्नाथचे डोळें भरून आले.

“जगन्नाथ, रडूं नकोस. तुला वाईट वाटलें ? नाही हो मी असें पुन्हां बोलणार. तूं मला श्रीमंत केलेस. तूं मला आईची पदवी देणार आहेस. मातृत्वाचा धन्य अनुभव देणार आहेस. नवप्रसूतीच्या वेदनांचा मोक्ष देणार आहेस. क्रान्तीचे बाळ जन्माला येतांना देशाला, समाजाला अशाच अनंत वेदना लागतात. लाखोंचें बलिदान. पवित्र वेदना. जगन्नाथ. तूं माझें रिकामें जीवन कांठोकांठ भरलेस. पूर्वी मी सारे करी. दिवस सारा कामानें भरलेला. लोकांना माझें जीवन सेवेनें भरलेलें दिसे. परंतु ते रिकामे होतें, सुने होतें. तू आलास व मला बहरला. कावेरी आंत कोरडी होती ती उचंबळूली. जगन्नाथ तूं मला काय दिलेंस? तूं का विचार दिलेस ? नाही. माच तुला विचार देत असें. मी तुला हिंदी शिकविले, तामीळ शिकविलें. मोपल्यांचा इतिहास सांगितला. क्रान्तीचे विचार सांगितले. दक्षिणेंतील कलांचा इतिहास सांगितला. दक्षिणेंत लोकसत्ताचे राज्ये कशी होती, प्राचीनकाळी निवडणुका कशा होत. नाणें पाडण्यापासूनचे हक्क पंचायतीस कसे असत, ठिकठिकाणीं तळी, कालवे, पाटबंधारे बांधून दक्षिण म्हणजे समुद्र बगीचाकसा बनला होता, तें सारें तुला सांगितले. तूं मला काय दिलेंस ? तूं मला प्रेम दिलेंस. ज्या प्रेमांतील अर्थाचा आत्मा शब्दांनी सांगता येणार नाही. तूं तुरुंगात होतास. तुझे स्मरम होतांच डोळे भरून येत. तूं घरीयेत. तूं घरी असस. मी हिंदी शिकवायला चाललें, हरिजन मुलांना शिकवायला चाललें की तूं बरोबर नाहीस म्हणून रडूं येई. तूं जणुं माझी पूर्णता. मी माझ्या जीवनांत किती तरी आणून ओतीत होतें. परंतु जीवनाचे भांडे भरत नव्हतें. तूं आलास. तूं पाहिलेंस व माझे भांडे उसळून ओसंडून वाहूं लागले. तूंच ना ती पैठणची गोष्ट सांगत असस ? लोक हजारों कावडी पाणी आणतात. परंतु हौद भरत नाही. परंतु देव एख कावड ओततो व हौद भरून जातो. माझ्या जीवनाच्या हौदांत क्रान्तीच्या विचारांच्या, हरिजनसेवेच्या, हिंदी भाषा-प्रचाराच्या, सत्याग्रहाच्या शेकडों कावडी मी आणून ओतीत होतें. परंतु हौद भरेना. जिवाचा मासा अनंत पाणी मागत होता. मनाच्या देवमाशाला उचंबळणारा समुद्र पाहिजे होता. आणि तो तूं दिलास. जगन्नाथ, जीवनाला परिपूर्णता देणारें प्रेम तूम मला दिलेंस. तूं आतां गेलास तरी चालेल. हे जीवन आता आटणार नाही. नामदेवासाठी पाण्यानें भरून वाहूं लागणारी विहीर मारवाडांत अद्याप वहात आहे म्हणतात. नामदेव गेला तरी विहीर वाहते आहे. जगन्नाथ, तूं आता जा, इंदिरेकडे जा. तुला मी वाटेत थांबविलें, तुझी गंगा जरा अडवल. माझा घडा भरून घेतला. इंदिरेला सांग की रागावूं नको. इंदिरेचा जगन्नाथ मी भिकारी करून नाही पाठवीत. श्रीमंत करून पाठवीत आहे. हंसवून, रडवून, भटकवून, नाचवून, चढवून, पाडवून पाठवीत आहे. जगन्नाथ, काय काय बोलूं ? तुझ्याजवळ अनंत बोलोवेंसे वाटतें. परंतु या ओठांनी हालचाल करून अनंत बोलता येत नाही. तुझे ओठ माझ्या ओठाशी आणून मुकेपणानें ते सारें तुझ्यांत ओततें ये.”

असें म्हणून तिने त्याला वांकवून जवळ घेतलें. त्याच्या डोळ्यांतील अश्रु तिच्या अश्रूंत मिळाले. तिचा श्वास त्याच्या श्वासोच्छवासांत मिसळला. तिनें अनंत बोलणें, अनंत भावना व विचार मुकेपणानें त्याला सांगितले.

“सांगितले ना सारें ? कळलें ना सारें ?”

जगन्नाथनें तिचा हात कुरवाळला. तो त्यानें हृदयापाशी धरला. आपल्या तोंडावर फिरविला. केसांवरून फिरवला. जणुं ता जीवन पुन्हां शांत करून घेत होती.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel