“तुम्ही वर जा येसफेस करायला. तुम्हांला व्यवहार कळत नाहीं. उगीच डोकें पिकवूं नका.” दिवाणजी उपहासानें म्हणाले.
“तुम्हांलाच कळत नाहीं. साधी माणुसकीहि कळत नाहीं.”
“माणुसकीनें इस्टेटी मिळत नसतात.”
इतक्यांत जगन्नाथाचा दादा तेथें आला.
“जगन्नाथ, तूं वर जा. येथें येण्याचें तुझें काम नाहीं.” तो म्हणाला.
“येणार. तूं कोण मला बंदी करणार? मी का गुलाम आहें तुझा?”
“वर जा ब-या बोलानें. नाहीं तर ओढीत नेईन.”
“जाणार नाहीं. काय करायचें असेल तें कर.”
तिरशिंगराव दादा संतापला. जो जगन्नाथाची बकोटी धरून ओढूं लागला. जगन्नाथहि ओढाताण करूं लागला. ते शेतकरी दीनवाणेपणानें “जाऊं दे रावसाहेब, सोडा.” असें म्हणूं लागले.
“तुम्ही चालते व्हा येथून. अजून येथें?” दिवाणजी गर्जले.
“नका रे जाऊं. बसा तुम्ही. माझ्या वरच्या खेलींत बसा. तुम्हांला चहा देतों, दूध देतों, पानसुपारी देतों.” जगन्नाथ म्हणाला.
“निघतां कीं नाहीं?” पुन्हां दिवाणजी शेतक-यांवर ओरडले. ते बिचारे निघून गेले. जगन्नाथ त्यांच्याकडे जाऊं पहात होता. दादानें जोरानें त्याच्या पाठींत एक तडाका मारला, जगन्नाथ उसळला. त्यानेंहि दादाच्या थोबाडींत एकदम मारली.
“मला मारतोस, मला मारतोस? माजलास तूं, मला मारतोस?” असें ओरडून दादा मारूं लागला. घरांतील मंडळी धांवून आली. आई आली. वडील आले.