“तुझे नांव काय?” स्वामीनी विचारले.
“नामदेव,” तो मुलगा म्हणाला.
“किती गोड नांव, आणि किती गोड तुझे डोळे.” असें म्हणून स्वामीजी तुकारामाच्या अभंगांतील चरण म्हणूं लागले,
“गोड तुझें रुप गोड तुझे नाम | देई मज प्रेम सर्व काळ ||”
“तुम्ही राहिलेत तर ना आम्ही प्रेम देणार?” नामदेवानें विचारलें.
“अरे, राहतीलच ते. ते आंता जाणार नाहीत,” दुसरा मुलगा म्हणाला.
“आणि तुझे रे नांव काय?” स्वामींनी विचारले.
“रघुनाथ,” तो मुलगा म्हणाला.
“रघुनाथसाथे प्रीत बांघो होय तैसे होय रे,” स्वामीनीं चरण म्हटला.
“तुमची तर मुलांशी इतक्यांतच मैत्री जडली,” गोपाळराव म्हणाले.
“मी एकदम जोडलाहि जातों, एकदम तोडलाहि जातो,” स्वामी म्हणाले.
“ आता आपण निघायचे ना? तुमची ही पिशवी मी घेतों,” नामदेव म्हणाला.
“ तें तिकडे धोतर वाळत आहे, तें तुमचेंच ना? मी तें घेऊन येतों,” असें म्हणून रघुनाथ गेला.
निघावयाची तयारी झाली. स्वामीजी जरा सचिंतपणे उभे होते. गोपाळराव त्यांच्याकडे पाहात होते.
“मी पुन्हां बंधनांत पडत आहे. ‘बंधन काट मुरारी’ अशी मी देवाला नेहमीं प्रार्थना करीत असतों,” स्वामी बोलले.
“मुलांचीं अज्ञानाची बंधने छाटून टाकण्यासाठी चला. स्वत:च्या जीवनाभोंवतालचीं असत्कल्पनांची जाळीं तोडून टाकलींत. या मुलांचे जीव त्यांत गुरफटू नयेत म्हणून ती छाटावयास चला. हें पवित्र काम आहे. मुलांच्या सान्निध्यांत राहाणें म्हणजे देवाच्या सान्निध्यांत राहाणें होय. मुलांचें राज्य म्हणजे देवाचें राज्य. मुलें म्हणजे देवाघरचा बगीचा. देवाच्या बागेंतील कळ्या फुलविण्यास चला,” गोपाळराव म्हणाले.