प्रतिज्ञा
स्वामींच्या डोक्यांतून नेहमीं नवीन नवीन कल्पना व नवीन नवीन उद्योग बाहेर पडत असत. अमेरिकेमध्यें वृक्षारोपणदिन पाळण्यांत येत असतो. तसा आपल्याकडे सुरु करावा असें त्यांच्या मनांत आलें. तपोवनांची संस्कृति ज्या भारतभूमींत जन्मली तेथें वृक्षांसंबंधी केवढी उदासीनता! तपोवने म्हणजे भारताची भूषणें. भूमातेच्या हिरव्या पदराखाली भारतीय संस्कृतीचें बाळ जन्मलें, पोसलें गेलें, वाढलें. परंतु हें बाळ आतां उघडें पडूं लागलें. दरवर्षीं लाखों झाडें तोडलीं जातात, परंतु नवीन किती लावली जातात? कोण विचार करतो? या कृषिप्रधान भारतवर्षाला मोठमोठ्या जंगलांची फार जरूर आहे. झाडें मेघांना ओढून आणतात. झाडी कमी झाली तर पाऊस कमी होतो. ठिकठिकाणीं पाऊस कमी होत आहे. देवाच्या नांवानें ओरडून काय होणार? आपलीं हीं पापें, आपला हा आळशीपणा, आपली ही विचारशून्यता! प्रत्येकानें दर वर्षीं एक तरी नवीन झाड पावसाळ्यांत लावावें. इटली देशांत मागें सरकारनें तीन लक्ष नवीन झाडें लाविली! अमेरिकेमध्ये वॉशिंगटनच्या दोन वाढदिवसाच्या दिवशी लाखों झाडें लाविली गेलीं. आणि अमेरिकेंत पुन: जंगलांची वाण नाही. मैलच्या मैल पसरलेलीं अफाट वनें, काननें तेथें आहेत. दरवर्षीं अमेरिकेंत मुलांमुलींकडून लक्षावधि झाडें लावलीं जातात. वृक्षारोपणाच्या दिवशी मिरवणुकी निघतात. भूमातेची, वृक्षाचीं सुंदर गाणीं म्हणण्यांत येतात! वाद्यें असतात, झेडें असतात! परंतु आपल्या या कर्मशून्य देशांत काय आहे?

हिंदुस्थानांतील खेडीं पूर्वी भरगच्च आंबराईत असत. भूमातेच्या हातांनी आलिंगलेलीं खेडीं असत. वृक्ष म्हणजे पृथ्वीचे हजारों हात होत. या हातांच्या प्रेमळ वेष्टनांत गांवें सुखानें नांदत. परंतु हे हिरवे हिरवे हात काटले गेले, छाटले गेले. गांवांची रया गेली, तेज गेलें. आंबराया नाहीशा होत चालल्या. गाईगुरांना बसायला छाया नाही. मुलांबाळांना खेळायला जायला जागा नाही. ही माझ्या हातचीं दहा झाडें असें ज्याला म्हणता येईल असे किती भाग्यवान् लोक या भारतात असतील?

स्वामींच्या मनांत आलें की दिवस सुरु व्हावा. आषाढी पौर्णिमा हा वृक्षसंवर्धनदिन म्हणून सर्वत्र पाळला जावा. परंतु आषाढी पौर्णिमा तर होऊन गेली होती. अद्याप पावसाळा होता. झाडे अजूनं जगलीं असलीं. अमळनेरांत ही प्रथा पाडण्याचें नक्की झालें. स्वामी मराठी शाळेंतील शिक्षकांना भेटले. इंग्रजी शाळेंतील शिक्षकांना भेटले. त्या प्रसंगार्थ सुट्टी देण्याचें सर्वांनी कबूल केले.

नामदेव, रघुनाथ, यशवंत, मुकुंदा वगैरे मुलांनी झेंडे तयार केले. वृक्षांच्या पल्ल्वांचे व फुलांचे झेडें तयार करण्यात आले. निरनिराळी ब्रीदवचनें तयार करण्यांत आलीं.
‘झाडें म्हणजे देवाची हिरवी मंदिरे’
‘झाड लावणें म्हणजे पाऊस आणणें’
‘झाडें लावाल तर सुखी व्हाल’
‘वृक्ष, लता, वेलीं हीं भूमीचीं भूषणें आहेत’
‘झाडांच्या सावलींत ऋषींनी तपश्चर्या केली’
‘वृक्ष म्हणजे भूमातेचे मगल आशीर्वाद’
स्वामींनीं निरनिराळीं ब्रीदवचनें दिली. सुंदर गाणीं करून दिली. मिरवणुकीची तयारी झाली.

‘गांवांतील इंग्रजी, मराठी शाळेंतील सारीं मुलें, मुली एकत्र जमली! खूपच उत्साह होता. प्रत्येक मुलांनें हिरव्या पानांची ध्वजा हातांत घेतली होती. वाद्यें वाजत होती. गावांतील कांही मुले घोड्यावर बसली होती. पताका फडकत होत्या. ब्रीदवचनें झळकत होती! जाहिराती वाटल्या जात होत्या. एका प्रचंड वटवृक्षाखाली सभा होणार होती. वड म्हणजे वृक्षवनस्पतींचा राजा. त्याच्या अध्यक्षतेखाली स्वामींनी दोन शब्द सांगितलें.  त्या त्या वर्गांतील मुलांनी आपापल्या वर्गांची झाडेवी लावा. त्यांची काळजी घ्यावी. एक झाड लावणें म्हणजे पाण्याचा एक मेघ आणणें होय’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel