"तुम्हाला कसाला त्रास आहे माझ्यामुळे ? मी जेवायला येतो हाच की नाही ? तुम्हीच तर जेवायला येत जा म्हणून सांगितले," स्वामी म्हणाले.
“आमच्या मनाला त्रास होई. तो कमी व्हावा म्हणून तुम्हाला जेवावयाला बोलावू लागलो. तुमची सर्वांना काळजी वाटते. जेवाल का नाही, कोठे जाल की काय ? लग्न केले म्हणजे बंधनात पडलेत. जबाबदारी आली. दुस-या जीवाच्या सुखदु:खाचा विचार आला,” गोपाळराव म्हणाले.
“लग्न न करताहि दुस-याच्या सुखदु:खाचा नाही का विचार कराता येत ?” स्वामींनी विचारले.
“विचार करता येतो, परंतु तितके नैतिक बंधन वाटत नाही,” गोपाळराव म्हणाले.
“गोपाळराव ! मी कितीही निराश झालो, मरून जावे असे कितीही मनात आणिले, तरी मी मरणार नाही. आपल्या जगण्याने एखाद्या तरी जीवाला सुख वाटत आहे, एखाद्या तरी झाडाला थोडे पाणी पडून ते वाढत आहे, अशी जोपर्यंत माझ्या मनाला खात्री वाटत आहे, तोपर्यंत मी मरणार नाही. याच माझ्या हृदयातील खोल आशावृत्तीमुळे, आस्तिक्य बुद्धीमुळे मी आजपर्यंत जीवंत राहिलो. गेली दोन तपे माझ्या निराशेकडून मी सतत ग्रासला जात असतानाहि माझा मनश्चंद्र पुन: पुन्हा बाहेर पडला,” स्वामी म्हणाले.
“कोणता संसार वाढवावयाचा आहे,” गोपाळराव मुख्य गोष्टीकडे वळले.
“देवपूरला आश्रम काढावा असे मनांत आहे,” स्वामी म्हणाले.
“तुम्ही तेथे जाऊन बसणार की काय ?” गोपाळरावांनी विचारले.
“मी काही आजच नाही जात. तेथे दोन चांगले स्वयंसेवक आहेत. ते तेथे धडपडत असतात. त्यांना तेथे वस्त्रस्वावलंबन वगैरे सुरू करावयाचे आहे. खादीच्यासंबंधी काही प्रयोग करावयाचे आहेत. प्रथम त्यांना स्वत:च विणकाम शिकून यावयाचे आहे. शिकून आले म्हणजे ते काम सुरू करणार आहेत. शिकून येण्यासाठी त्यांना शंभर रुपये पाहिजे आहेत. कोठून आणावयाचे शंभर रुपये? मनात निरनिराळे विचार करीत होतो. शेवटी एक पुस्तक लिहावयाचे ठरविले. ते लिहून तयार आहे. ‘गोड गोष्टी’ हे त्याला नाव आहे. तुमच्या ओळखीचा कोणी प्रकाशक आहे का? शंभर रुपयाला आपण ते देऊन टाकू. दोनशे पानांच्या पुस्तकाला शंभर रुपये कोणीहि देईल असे वाटते.” स्वामी म्हणाले.
“मीच देतो तुम्हाला शंभर रुपये. तुमचे हस्तलिखित मी विकत घेतो. काय हरकत आहे?” गोपाळरावांनी विचारले.
“माझी काही हरकत नाही. परंतु तुम्ही का त्रास घेता? तुम्हाला तर पुस्तक म्हटले म्हणजे कपाळाला आठ्या पडतात,” स्वामींनी विचारले.