“आम्ही हृद्य तोडून सांगतो तर तुम्हाला थट्टाच वाटते,” नामदेव म्हणाला.

“बरे, थट्टा नाही. तुम्ही सांगितले आहे त्याप्रमाणे वागेन,” स्वामी म्हणाले.

झाली शिट्टि, निघाली गाडी.

स्वामी खिडकीतून त्या दोघा प्रेमळ मित्रांकडे पाहीत होते. नामदेव व रघुनाथ उभे होते. गाडी गेली. दिसेनाशी झाली. दोघे मित्र उभेच होते. न कोणी बोले, ना हाले, ना चाले. दुस-या एका गाडीसाठी घंटा झाली. नामदेव व रघुनाथ भानावर आले. हातात हात घालून ते दोघे बाहेर आले.

“स्वामी खरेच का स्वयंपाकी होणार, आगीजवळ बसणार ? खानदेशाची सेवा करता यावी, खानदेशाला प्रचारक मिळावे, म्हणून चुलीजवळ पोळ्या भाक-या का भजीत बसणार य़” रघुनाथ खिन्नपणे म्हणाला.

“कोणाला माहीत ? चुलीजवळ सांडलेल्या त्यांच्या त्या पवित्र, प्रेममय घामांतून आपला खानदेश फुलो व सजो, उठो व नटो. त्यांच्या आगीजवळच्या तपश्चर्येने सारा खानदेश पेटू दे, सा-या खानदेशाच्या तरूणांच्या हृद्यात आग पेटू दे,” नामदेव म्हणाला.

आकाशात भगवान सूर्य नारायण इतका जळत असतो, तेंव्हा कोठे मनुष्याच्या शरिरांत जगण्यापुरती ऊब राहाते. समाजांतील थोर पुरूष सुर्यासारखे  जळत असतात, जीवनांच्या  होळ्या पेटवून ठेवतात, तेंव्हा कोठे समाजाच्या हृद्यात थोडीतरी ऊब उत्पन्न होते, कर्तव्याची मंदशी ज्वाळा जळू लागते,” रघुनाथ म्हणाला.

“‘ सन्तो सपसा भूमि धरयन्ति,’” नामदेव म्हणाला.

“जळतात आहोरात्र | संत हे भास्करापरी,” रघुनाथ म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel