“तुम्ही या खेड्यांना प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. या अनंतबाह्य अनंतशीर देवाला कोणता नैवेद्य हवा आहे तें मग समजू लागेल. या देवाला कशाची भूक आहे, कशाची तहान आहे, कशाची वाण आहे तें तुम्हांला कळून येईल. मग या विराट देवाशी तुम्ही एकरुप व्हाल,” स्वामी बोलत होते.

पावसांतील थंडीत मुलांच्या हृदयाला ऊब येत होती. भावनांची ऊब मिळत होती! ती ऊब म्हणू का पाऊसच म्हणू? वरुन पाऊस पडून देह ओले होत होते. स्वामींच्या विचारांच्या वृष्टीनें मनें ओलीं होत होती, हृदयें ओलीं होत होती.
“यशवंत! योग्यांची एक गंमत तुला माहीत आहे का?” स्वामींनी प्रश्न विचारला.

“ते तास तास नाक धरून बसतात,” यशवंत हंसत म्हणाला.
“ते पाण्यावरून चालत जातात, हवेंतून उडत जातात,” नामदेव म्हणाला.
“ ते हवा खातात व फक्त पाणी पितात; तरी गलेलठ्ठ दिसतात,” मुकुंदा म्हणाला.

“ते सारें जाऊ दें खरा योगी जो असतो, त्याची इंद्रिये फार सामर्थ्यवान होतात. त्याच्या कानांना दूरचा आवाज ऐकू येतो, त्याच्या नाकाला दूरचा गंध येतो, त्याच्या डोळ्यांना दुरचें दिसतें. तो ता-यांचे संगीत ऐकतो व नंदनवनांतील कल्पवृक्षांच्या फुलांचा वास घेतो,” स्वामी सांगत होते.

“तो नरकांतील घाणहि मग घेईल. त्याचा दूरची घाण नाही का येणार?” वामननें विचारलें.
“हो, तीहि त्याला येईल. सा-या सृष्टीतील रंग, गंध, ध्वनि जणु त्याचें होतात. तो जणु पोकळ झालेला असतो. सा-या सृष्टींतील वारे त्याच्यामध्ये घुसतात. तो जणु स्वत:ला विसरतो व विश्वाशी एकरुप होतो. परंतु आपलें जीवन पहा! आपलीं इंद्रियें स्वत:च्याच विचारानें रात्रंदिवस भरलेली असतात. अहंकारानें आपण अंतर्बाह्य बुजून गेलेले असतो. आपल्या वैयक्तिक सुखदु:खाचें एकेरी संगीतच आपण ऐकत असतो. परंतु आजूबाजूच्या लाखों लोकांच्या सुखदु:खाचा आवाज आपल्या कानांत शिरत नाही. आपण आतां या गावांतील ती हरिजनबाई पाहिली. काय तिची दशा! मुलांच्या अंगात नाही, निजायला कांही नाहीं, खायला कांही नाही! हिंदुस्थानांतील दगडांच्या मूर्तींच्या डोक्यावर हिरेमाणकें चमकत आहेत आणि हीं देवाचीं हिरमाणकें मातींत मिळत आहेत! हा आर्तनाद कोणाच्या कानांत जातो? हा आर्तनांद विवेकानंदांच्या कानांत घुसला, महात्माजींच्या कानांत घुसला! परंतु तो तुमच्या आमच्या कानांत कां घुसत नाही?

“गड्यांनो! अशीं महादेवाची दर्शनें घेत जा, म्हणजे तो आवाज ऐकू येऊ लागेल. जरा स्वत:च्या खोल्यातून बाहेर या. खुर्च्यांवरून, पलंगांवरून गाद्यागिरद्यांवरुन जरा उठा. मोटारींतून,बंगल्यांतून जरा बाहेर या. ही प्राणघेणीं गाणी इकडे चाललीं आहेत. ते थांबवा जरा रेडिओ, म्हणजे या लाखों हांका तुमच्या कानांत घुसतील!

“नामदेव, रघुनाथ, य़शवंत, मुकुंदा! तुम्ही मोठे व्हाल तेव्हां या महादेवाला विसरु नंका. या महादेवाचें दर्शन आज तुम्हांला घडलें आहे. त्याची स्थिति तुम्हीं पाहिली आहे. या महादेवाची खरी पूजा ज्याला करावयाची असेल, त्याला या भारतात विशाल क्रांति करावी लागेल. ती क्रांति उत्पन्न झाली आहे. या क्रांतींत घुसावें लागेल. घुमावें लागेल; त्या क्रांतीसाठी जगावें लागेल, त्या क्रांतीसाठी मरावें लागेल,” स्वामी भावरूप होऊन बोलत होते.

तो पाहा आला नाला! अरे बापरे! किती पाणी आलें आहे नाल्याला! लाल लाल पाणी ! फेसाळ पाणी! सारी घाण वाहून चालली आहे.

“घाण वाहून जाण्यासाठी अशा विचारांच्या लाटा उसळल्या पाहिजेत; कर्मांचे प्रवाह सुरु झाले पाहिजेत,” स्वामी म्हणालें.
“आता पलीकडे कसे जावयाचें? किती आहे पाणी? ओढ फार असेल,” मुलें बोलूं लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel