“हृदय तू” भिका म्हणाला.
“ती येथे थोडीच राहील? पळेल सासरी, मग तोंड होईल बंद. दाराच्या बाहेरहि मग जाऊ देणार नाहीत,” स्वामी म्हणाले.
“मी तेथून पळेन व उडून जाईन,” वेणू म्हणाली.
“कोठे जाशील उडून?” स्वामींनी विचारले.
“जाईन आपली कोठें तरी. मला काय माहीत?” वेणू म्हणाली.
“आमच्या गावांतील मंदिर व मशील पाहायला येता? आमच्या गांवांत पूर्वीपासून हिंदुमुसलमान सलोख्यानें राहात आले आहेत. मुसलमान आता अगदी गरीब झाले आहेत. मशिदीचें उत्पन्न सारें सावकारांच्या घऱांत गेले आहे. उत्तर
हिंदुस्थानांतून रजपूत खानदेशांत आले व ठिकठिकाणीं राहिले. देवपु-यांत रजपूतच मुख्यत्वें करून आहेत. परंतु आतां आम्ही मराठे म्हणूनच ओळखलें जातो,” रघुनाथ हकीकत सांगत होता.
“भाऊ, तो खंजीर दाखव त्यांना,” वेणू म्हणाली.
“पूर्वंजांचा खंजीर आहे घरात. लहानपणी मला त्याला फार अभिमान वाटे. अजूनहि वाटतो,” रघुनाथ म्हणाला.
वेणू खंजीर घेऊन आली. स्वामींनी हातात घेतला व त्याला प्रणाम केला.
“तुम्ही नमस्कार कसा केलात? वेणूनें विचारलें.
“हा खंजीर कोणीं हातांत धरला असेल कोणाला माहीत? एखाद्या थोर वीरानें तो हातांत धरला असेल, एखाद्या सतीनें सतित्व राखण्यासाठी तो मुठींत घट्ट पकडला असेल, कमरेला खोंचून ठेवला असेल! रजपुताच्या घरांतील खंजीर! त्यांत शौर्य, धैर्य, पावित्र्य त्याग यांचे सागर भरलेले असतील,” स्वामी म्हणाले.
“तुम्हीहि पाहाना खंजीर,” वेणू नामदेवाला म्हणाली.
“खंजिराची मला भीति वाटते,” नामदेव म्हणाला.
“नुसता हातात घ्यायला भीति?” वेणूनें विचारलें.
“मग बासरी हातांत धरणारा तो बायकी हात,” रघुनाथ म्हणाला.
“कृष्ण का बायको होता? त्यानें तर कसाला मारले.” वेणू म्हणाली.
“आणि आपला हात शांतपणें कंदिलावर भाजून घेणारा – ती का शूर नाही?” स्वामी म्हणाले.
“चला, आपण गांव पाहू,” रघुनाथ म्हणाला.
सारी मंडळी निघाली. बरोबर भिका व जानकूहि होते. वेणूला आईनें घरात बोलविलें म्हणून ती घरात गेली. आईबरोबर तिला दळायचे होते.
“हें आमच्या गांवांतील राममंदिर,” रघुनाथ म्हणाला.
रामाच्या मूर्ति पाहून स्वामी क्षणभर ध्यानस्थ झाले.
“राम या नावांत केवढे पावित्र्य, केवढा इतिहास, केवढें काव्य भरून राहिलें आहे. भारतीय संस्कृतीतील व्यक्ति आपल्या जीवनांत एकरूप झाल्या आहेत.” स्वामी म्हणाले.
“येथेच आम्ही माग लावणार आहोत,” जानकू म्हणाला.