‘हे काय, रिकामा घडा घेऊन मी चाललें ! वेडो, खरेच मी वेडो !’ वेणू हंसली. पुन्हां पळत पाण्यावर गेली. तिनें घडा भरला. भरलेला घडा तिनें डोकीवर घेतला. भरलेली वस्तु पूज्य आहे ! भरलेले हृदय, भरलेलें मन; भरलेला घडा, भरलेला गाडा; भरलेलें कणीस, भरलेलें भांडे; भरलेला हात, भरलेलें कपाळ; भरलेली ओटी, भरलेली कास; भरलेलें सारें पवित्र आहे. या जगांत पोकळ वस्तूला स्थान नाही; रिकाम्या, निस्सार, शुष्क वस्तूला मान नाहीं ! भरलेल्या भारताला मान मिळेल ! पोकळ बडबड्या, चिरचिर्‍या भारताला स्थान नाही ! भारत दिव्य भावनांनी भरूं दे; बंधु प्रेमानें भरू दे; ज्ञानानें, तेजानें, त्यागानें भरूं दे. जग त्याला डोक्यावर घेईल. विश्वंभर त्याला डोक्यावर घेईल.

भरलेली वेणू भरलेला घडा घेऊन भरलेल्या गावांत आली. गांव भरत होता. गायीगुरें येत होतीं, हंबरत येतं होतीं. भरलेल्या पोटानें, भरल्या कासेनें, भरल्या हृदयानें येत होती. गुराखी येत होते. रानातील मस्त हवा खाऊन, पांवे वाजवून, नाचून कुदून, खेळून येत होते. शेतांत काम करणारे परत येत होते. गांवातून बाहेर गेलेले सारे गांवात येत होते. गांव भरत होता. गायीवांसरे भेटत होती. कुटुंबांतील सारी भेटत होतीं.

वेणू घरांत आली. घरांत अंधार भरला होता. परंतु अंधआरांत दिवा होता. तेलानें, स्नेहानें भरलेला होता. भरलेला घडां वेणूनें ठेवून दिला. वेणू दिव्याजवळ बसली ! कशी सुंदर ज्योत ! कशी अंधारात नाचते, चमकते, शोभते ! सार्‍या अंधाराला एका दिव्यानें शोभा आली ! एकच ज्योत ! परंतु सारा अंधार प्रकाशमय झाला.

“वेण्ये! दुपारी जेवली नाहीस. चल आतां जेवायला,” आईने हाक मारली.

“आई! खूप भूक लागली आहे. मी सार्‍या तुझ्या भाकरी खाऊन टाकीन. तुला ठेवणार नाहीं,” वेणू म्हणाली.

“आधीं एक तर पानांतील खा. बडबडू नकोस. पोटभर जेव,” आई म्हणाली.

“आई, एखादे वेळेस आपलें आपलें वाटतें की डोळे मिटून राहावें. कां ग असें वाटतें ?” वेणूनें विचारलें.

“भक्त डोळे मिटतो. देवाची पूजा करताना डोळे मिटतात. तुझे आजोबा तास तास डोळे मिटून बसत,” आई म्हणाली.

“त्यांना मनांत कांहीं दिसे; होय ना ? त्यांना का मनांत देवाची मूर्ति दिसे ? जे आपल्याला आवडतें, तें मग दिसतें; नाहीं का ? तेवढेंच दिसतें, बाकी सारें जातें, दूर जातें. नाहीं ?” वेणूनें विचारलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel