नामदेव व रघुनाथहि उठले. घरांतील दळणें थांबले.

“वेणू, चल. प्रार्थनेंत गाणें म्हण,” रघुनाथ म्हणाला.

प्रार्थना सुरू झाली. वेणूनें गाणें म्हटलें.

अंतरमाथी नाही रे विसरू हरी,’ हे गाणें म्हणणत्यांत आलें.

स्वामी म्हणाले, “वेणू, आणकी एक म्हण”

वेणूनें गाणें म्हटलें.

‘मुखडानी माया लागी रे | मोहन प्याला
दोन्ही उत्कृष्ट भक्तिरसानें भरलेली पदे.

“वेणू, खरोखरच तू देवाची वेणू आहेस. किती गोड म्हणतेस! रघुनाथनें तुला पदें तरी किती छान छान शिकविली आहेत,” स्वामी म्हणाले. मंडळी परत जावयास निघाली. वेणूला वाईट वाटलें.

“आतां तुम्ही सारे कधी परत याल?” वेणूनें विचारलें.

“वेणू बोलावील तेव्हा,” स्वामी म्हणाले.

भिका व जानकू प्रार्थनेस आले होते. स्वामींनी त्यांना उत्साह दिला व सारें नीट होईल असें आश्वासन दिलें. गांवच्या सीमेपर्यंत ते पोंचवावयास आले. “वंदे मातरम् वंदे मातरम्” जयजयकार करण्यांत आला.

“जा आतां. कोणी नावें ठेविली तरी काम सोडू नका” स्वामी म्हणाले.

“होय. आम्ही धडपडत राहू,” जानकू म्हणाला.

“आपण सारी धडपड करणारी मुलें,” रघुनाथ म्हणाला.

“तेंच आपलें भाग्य! तोच मोक्ष,” स्वामी म्हणाले.  भिकाव जानकू परत गेले.

“आजची भेट फारच महत्त्वाची झाली,” स्वामी म्हणाले.

“येथे उद्योग-मंदिर सुरु होईल. खादी तयार होईल. खादीच्या पाठोपाठ आलेंच स्वराज्य, आलेच नवविचार, आलीच हरिजन चळवळ, आलेंच रुढी फेंकणें, आलेंच मृत्तभोजनवर्जन, आलाच तेजस्वी नवधर्म! गायत्रीमंत्राचा, त्यागाचा धर्म!” स्वामी पुन्हा म्हणाले.

“रघुनाथच्या देवपूरचें भाग्य!” नामदेव म्हणाला.

“देवपूरचें भाग्य तें तुझेंहि भाग्य-आपलें सर्वांचे भाग्य,” रघुनाथ म्हणाला.

“महत्त्वाच्या घडामोडी होतील असें वाटते. भिका जानकू तेजस्वी हिरे आहेत. देवपुराशीं आपलें लग्न लागणार! पुन: पुन: यावें लागणार! स्वामी पसा-यांत गुंतून जाणार!” स्वामी म्हणाले.

“स्वामी एकदा गुंतले म्हणजे मग जाणार नाहीत; उडून जाणार नाहीत आमच्याजवळ राहातील,” रघुनाथ म्हणाला.
“परंतु तुम्हीहि गंतून राहिले तर. धडपड करू लागले तर. माझे एकट्याचें कर्माशी लग्न लागून चालणार नाही. तुमची सर्वांची लागली पाहिजेत! आपल्या भावी कार्याचाच आज आपण आरंभ केला. भावी जीवनाचें बीज पेरलें गेलें. भावी आश्रमाची जुळवाजुळव जमत आली नाही? माझा पसारा वाढू लागला म्हणजे छात्रालय मला सोडावें लागेल,” स्वामी म्हणाले.

“छात्रालय सोडा. परंतु खानदेश सोडू नका. आम्हाला सोडू नका,” नामदेव म्हणाला.

“देवपुरांत गेलेले जीव एकमेकांस कसे सोडतील?” स्वामी म्हणाले.

“देवपूरचा जयजयकार असो!” नामदेव म्हणाला.

“देवपूरचा जयजयकार असो!” सारे गर्जले.

अजूबाजूच्या ढेंकड्यावरून देवपूरचा जयजयकार असो असे शब्द घुमले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel