“स्वामी! मजुराला थोडा वेळ विसावा मिळाला तर तो वेळ कसा दवडील याची तुम्हाला चिंता वाटते. आणि आजचे हे खुशालचेंडू भांडवलवाले, हे जहागीरदार, सावकार, कारखानदार हे आपला वेळ सार्थकीच लावीत असतील नाही? मोटारीतून हिंडावे, नाचतमाशे करावे, वेश्यांच्या संगतीत रात्री दवडाव्या, अजीर्ण होईपर्यंत खावे व मग वर सोडे प्यावे—ही संस्कृतीच नाही का? हा आत्म्याचा विकासच आहे नाही? गाद्यागिर्धांवर शेणगोळ्यासारखे लोळत पडणारे हे किडे, ही बांडगुळे, हे सैतानी साप—हे कोणती संस्कृति निर्माण करीत आहेत? एकीकडे मजुराची दु:खे यांना दिसत नाहीत, आणि तिकडे मंदिरे उभारतात! एकीकडे मजुरांच्या मानेवर हे पाय देतात, आणि तिकडे राष्ट्राची मान वर व्हावी म्हणून देणग्या देतात! दुस-याचे दु:ख न समजण्याइतके जड झालेले हे लोक यांचा आपण उदोउदो करतो! धर्मरक्षक व संस्कृतिसंवर्धक म्हणून त्याचे पुतळे करितो. कसे हे सारे तुम्हाला सहन होते? भ्रामक तत्त्वज्ञाने का निर्माण करता? मजूर म्हणे कसा वागेल? रिकामा वेळ मिळाला तर पतित होईल! होऊ दे पतित! खाऊन पिऊन होऊ दे पतित. या सा-या पतित जगात त्यानेच मरमर मरून पुण्यवंत राहावे का? लाथा खाऊन देवाचे व्हावे का? होऊ देत सैतानाचे, परंतु सुखी होऊ देत.
“आणि स्वामी! तुम्ही मनुष्याच्या सत्प्रवृत्तीवर का विश्वास ठेवीत नाही? सत्याग्रह करताना महात्माजी मनुष्यातील सदंशावर विश्वास ठेवीतात. मग या वेळेस का ठेवू नये? मनुष्य हा मुळात पापी आहे का पुण्यावान आहे? ख्रिस्ती धर्म मानतो की मनुष्य हा मूळांत पापीच आहे. उपनिषदे म्हणतात मनुषअय परब्रह्म आहे. कोणते स्वरूप खरे? मनुष्याला रिकामा वेळ मिळाला तर तो वाईटच वागेल असे का गृहीत धरता? श्रीमंत लोक आपला रिकामा वेळ वाईट दवडतात. त्यांना मुळीच काम नसते. परंतु यंत्रयुग आले तरी काही श्रम हा करावा लागणारच! तेवढा श्रम माणसाला पुरे. अमेरिकेतील थोराने एके ठिकाणी म्हटले आहे, ‘जा, जरा काम करा. अंगांतून घाम काढा. म्हणजे तुमचा सैतान दूर पळेल. तुमची पोटदुखी दूर होईल.’ शरीर व बुद्धी दुबळी होणार नाहीत इतका श्रम राहीलच. मनुष्यस्वभावावर श्रद्धा ठेवूनच चालू या. तो मूळांत मंगल आहे असे धरून वागू या. पाहू या काय होते ते. होऊ दे हाहि प्रयोग,” गोविंदा म्हणाला.
“सामुदायिक कामे करण्यांत मनुष्याची नीतिमत्ता वाढलेली असली पाहिजे. नाहीतर जे सर्वांचे काम ते कोणाचेच नाही. प्रत्येक जण जर टंगळमंगळ करील तर काम कसे होईल? काही प्रामाणिक लोक ज्याप्रमाणे स्वयंसेवकांत मरेमरेतो काम करतात आणि काही टंगळमंगळ करितात, तसे व्हावयाचे. अधिक स्वातंत्र्य म्हटले की अधिक नीतिमत्ता आली; अधिक जाणीव व जबाबदारी आली,” स्वामी म्हणाले.
“जाणीव व जबाबदारी अकस्मात् थोडीच येणार आहे? असे चुकत चुकतच पुढे जावे लागेल. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की, चूक करण्याचेही स्वातंत्र्य आम्हाला हवे आहे, तसेच हे. सुराज्यापेक्षा माझ्या प्रयोगाचे स्वराज्य मला पाहिजे आहे. जनतेच्या प्रयोगाचे स्वराज्य आम्हांस पाहिजे आहे. सामुदायिक प्रयोग आम्ही करू. कर्तव्याची जाणीव देऊ. उदाहरणाने दाखवू. आदर्श हे सर्वत्र असतीलच. जगातील सारे प्रयोग मंगलावर श्रद्धा ठेवून चालतात. आमचाहि होऊ दे तसा प्रयोग.
“दिवसभर काम करून दमलेला मनुष्य घरी येतांच पडतो व झोपी जातो. त्याला वाटेल ते चाळे करण्यास वेळच नाही. अशा प्रकारे वागण्यांत मानवाचा विकास नाही. त्याला रिकामा वेळ मिळूनहि, त्याची शक्ति शिल्लक ठेवूनहि, उत्साह असूनहि जर तो नीट वागला तरच खरे. दडपून ठेवल्यामुळे चांगले वागणे म्हणजे ती गुलामगिरीच होय. कामामुळे मनुष्याची खच्ची करायची व त्याला पावित्र्याचे प्रशंसापत्र द्यावयाचे. अशा प्रकारची ही तुमची विचारसरणी दिसते,” गोविंदा म्हणाला.