एकदा छात्रालयाची म्हैस हरवली. गोपाळराव म्हैस शोधावयास निघाले. म्हैस सांपडेपर्यंत त्यांना चैन पडलें नाही. ‘देवा, म्हैस सांपडो, तुला खडी साखर ठेवीन,’ असें ते म्हणाले. शेवटी एकदांची म्हैस सांपडली. गोपाळरावांनी खडीसाखर वाटली.
गोपाळरावांची ईश्वरावर श्रद्धा होती. गांवाबाहेर दूर असलेल्या मारुतीच्या दर्शनाला ते शनिवारी नित्यनेमानें जावयाचे. त्या मारुतीला डुबकीचा मारुती असें म्हणत. डुबकी म्हणून तेथें पूर्वी गांव होतं. पेंढा-याच्या भीतीमुळें तें गांव उठून गेले. गोपाळराव मारुतीला प्रदक्षिणा ठरलेल्या घालावयाचे कांही वर्षें ते दर शनिवारी सायंकाळी तेथे दिवळी नेऊन लावीत.
गोपाळराव संध्या करावयाचे. थोडी ध्यानधारणा करावयाचे मनाचे सर्व श्लोक म्हटल्याशिवाय ते राहात नसत. ते त्यांचे पाठ होते. एखादे दिवशीं जर मनाचे श्लोक म्हणावयाचे राहिले तर दुस-या दिवशी ते दोन वेळां म्हणत.
गोपाळराव अंधश्रद्धावान् नव्हते. रुढींचा त्यांना तिटकारा होता. एकदां अमळनेरांत एक गृहस्थ फिरून लग्न करणार होते. पहिली बायको होतीच. पहिल्या बायकोला माहेरी पाठवून इकडे न कळत द्वितीय विवाह ते करणार होते. ते गृहस्थ गोपाळरावांचे मित्र होते. गोपाळरावांना वाईट वाटलें शाळेंतील सर्व शिक्षक घेऊन ते त्या सद्गृहस्थाकडे गेले व धरणें धरून बसले. शेवटी तें लग्न झालें नाही. गोपाळरावांनी त्या गृहस्थास दुसरीकडे नेले. त्यांच्या पत्नीस तारेनें बोलाविलें. त्या पत्नी आल्यावर गोपाळराव त्यांना म्हणाले, ‘ हे पति ताब्यांत घ्या.’ गोपाळरावांचे मित्र हंसले. या लग्नामध्ये मध्येंच दलाली उपटणारे जे लोक होते त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या या मास्तरांना असल्या गोष्टींची उठाठेव कशाला, वगैरे ते बोलत. परंतु गोपाळराव निर्भय व नि:स्पृह ते त्या लोकांना म्हणत, ‘शिक्षक म्हणजे कचरा नाही. शिक्षक हा सर्व गांवचा शिक्षक आहे. विसरुं नका. खेड्यांतील शिक्षक गावचा सल्लागार असतो.’ ज्यांचे लग्न गोपाळरावांनी होऊं दिले नाही ते गृहस्थ मात्र सज्जन होते. गोपाळरावांवर ते रागावले नाहीत. गोपाळराव कधीं भेटले तर ते त्यांना म्हणत, ‘साहेब! तुम्ही किती चांगली गोष्ट केलीत! मला वाचवलेंत व त्या मुलीलाहि वाचवलेंत. तुमचे खरोखर उपकार आहेत!”
गांवांतील व्यापारी, वकील वगैरे जर एखादे वेळेस उगीचच्याउगीच शाळेवर, छात्रालयावर, शिक्षकांवर टीका करु लागले, तर गोपाळराव त्यांना तेथल्यातेथें सुनवीत. ते नसल्या उठाठेवी करणा-या वकिलांना एकदा म्हणाले, ‘तुम्ही वकील झालेत म्हणजे का सर्वज्ञ झालेत? तुम्ही खोटेंनाटें शिकवावें, मुन्सफाची मनधरणी करावी. पैसा तुमचा देव, व या देवाला मिळविण्याचें असत्य हें तुमचें साधन. तुम्ही काय आम्हाला सल्ला देणार? शिक्षणशास्त्राचा अभ्यास केला आहे का? ध्येयें कधी डोळ्यांत खेळविली आहेत का?”
ते व्यापा-यांना एकदा म्हणाले, ‘तुम्ही पैसे द्या, परंतु पैशाबरोबर मतें आणू नका. शिक्षण कसें द्यावें हे शिक्षणतज्ज्ञांना ठरवू दें. तुम्हाला व्यापार कसा करावा हे आम्ही सांगणें योग्य नाही, व तुम्ही असें करा, तसें करा याप्रमाणे आम्हाला प्रवचन देण्याची ऐट आणू नये.
एकदा एक लक्षाधीश व्यापारी छात्रालयांत आले. या व्यापा-यांची सहानुभूति असे. ते काहींतरी छात्रालयांसंबंधीची तक्रार घेऊन आले होते ते गोपाळरावांना म्हणाले, “गोपाळराव! तुम्हाला कांही सुचवावयास मी आलों आहे.”
“वा: फार छान. व्यापार थोडावेळ दूर करुन तुम्ही मुलांच्या विकासाकडे लक्ष देऊ लागलेत, ही आनंदाची गोष्ट आहे,” गोपाळराव म्हणाले.
“गोपाळराव! छात्रालयांत म्हणे सारी मुलें एके ठिकाणी जेवावयास बसतात?” व्यापा-याने प्रश्न केला.
“एके ठिकाणी म्हणजे काय? प्रत्येकाला पाट व प्रत्येकाचें ताट निरनिराळे असतें. दोन पाटांमध्ये दीड वितीचे अंतर असते.” गोपाळराव म्हणाले.