देवपूरला सूत रवाना झाले. गावांतील मुलांच्या मदतीने ताणा झाला. पांजण झाली, भागावर खादी चढली! पहिली देवपूरची खादी! ज्या वेळेस ती सणगे विणून तयार झाली, तेव्हा भिकाचा आनंद गगनांत मावेना. ती ठाणे हृदयाशी धरून तो नाचला! ‘आमच्या गावची खादी, आमच्या हातांनी विणलेली खादी, आमच्या आश्रमाची खादी! पंख असते तर स्वामींजवळ एकदम गेलो व त्यांच्या हातांत ही दिली असती’ असे त्याला वाटले ! दुस-या दिवशी एका सायकलवर बसून ती ठाणे घेऊन तो अमळनेरला गेला. स्वामींच्यासमोर ती स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठाणे त्याने ठेविली. स्वामींनी प्रणाम करून ती हातांत घेतली. त्यांच्या डोळ्यांत धन्यतेचे पाणी आले!
“भिका? छान हो छान. चालू दे काम. भिका, पण एक लक्षांत ठेव. चरखा व माग यांच्या नादाबरोबर विचारांचा नादहि सुरू झाला पाहिजे. खादी मुकी नको. खादी म्हणजे संघटना; खादी म्हणजे स्वाभिमान; खादी म्हणजे स्वावलंबन; खादी म्हणजे निर्भयता; खादी म्हणजे प्रेम; खादी म्हणजे दुस-यांचे दु:ख जाणणे व दूर करावयास धावणे; खादी म्हणजे स्वराज्य; खादी म्हणजे स्वातंत्र्य! खादी हे एक प्रतीक आहे, चिन्ह आहे. शेवटी विचार ही मुख्य गोष्ट. हातांत खादी घेऊन स्वातंत्र्याकडे जावयाचे! चक्राचिन्हांकित राष्ट्राचा झेंडा शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारा झाला पाहिजे. भिका! रघुनाथ, नामदेव, यशवंत पुढे येऊन तुम्हाला भेटतील, तुम्हाला मिळतील! आपण सारे एक आश्रमांतले, एका महान् आश्रमातले. जमाखर्च नीट ठेव. तुला येतोच आहे लिहावयास. संस्था म्हटली म्हणजे पैनपैचा हिशेब हवा,” स्वामी म्हणाले.
“त्याला मी जपत आहेच. आश्रमाची अब्रू म्हणजे आपले प्राण!” भिका म्हणाला.
भिका परत गेला. छात्रालयांतील मुलांना स्वामींनी एका शनिवारी रात्रीच्या सभेत विचारले, “देवपूरच्या आश्रमांतील खादी तुम्ही घेत जाल का? जर घ्याल तर किती छान होईल! तेथील बेकार बायांना काम मिळेल. तुम्ही खादी घेताच. खादी भांडारांतील घेण्याऐवजी येथील आश्रमाची घ्या. शेवटी स्वदेशीधर्म म्हणजे शेजारधर्म! आपले हात जवळच्या माणसासाठी आधी धावले पाहिजेत. कारण जवळचाच माणूस आपल्यासाठीहि आधी धावून येईल. शेजारचा मनुष्य असंतुष्ट व उपाशी ठेवून भागणार नाही.”
“हो, आम्ही घेऊ. आम्ही आश्रमांस भेट देऊ. सायकलवरून आम्ही जाऊ,” काही मुले उत्साहाने म्हणाली.
देवपूरला मुले जाऊ येऊ लागली. रविवारी सायकलवरून मुले जावयाची. जाताना फराळ घेऊन जात. नदीवर आनंदाने खात. आश्रमांत येणा-या मुलांबरोबर गप्पा मारीत. गावक-यांना कौतुक वाटे.