“ज्या देशांतील लोकांना जवळच्या भावबहिणींच्या किकाळ्या ऐकू येत नाहीत, जवळच्या कोट्यवधि लोकांची खग्रास जीवनें दिसत नाहीत, त्यांना या निर्जीव कांचांची रडगाणीं कशी ऐकू येणार?” मुकुंदा म्हणाला
“जी मुलें स्वत:चे दातहि स्वच्छ ठेवीत नाहीत, ती कंदील कां स्वच्छ ठेवतील? नरहर म्हणाला.
“मुलें ओंगळ राहातील, परंतु आईला तें पाहावेल का?” स्वामीनी प्रश्न केला.
“आई मुलांचे नाक पुशील, त्याला स्वच्छ करील,” जनार्दन म्हणाला.
“आई तसें न करील तर ती आईच नाही,” मुरलीधर म्हणाला.
“आईला सारें साजून दिसतें. इतरांना नाही,” नरहर म्हणाला.
“परंतु माझीहि इच्छा तुमची आई व्हावें अशी आहे,” स्वामी म्हणाले.
“जगांत आई एकच असते. आई ती आई,” नरहर पुन्हा म्हणाला.
“नरहर! ध्येय हें नेंहमी दूरच असणार. मी आई होऊं शकणार नाहीं. आई होऊ शकेन असो अहंकार मी नाही घरीत; परंतु तें माझे ध्येय आहे. ध्येयाच्या जवळ जितकें जाता येईल तितकें जावें.” स्वामी म्हणाले.
“तें कांही असो. परंतु तुम्ही हे धुण्यापुसण्याचें काम करु नका,” मुरलीधर म्हणाला.
“तुम्ही स्वच्छ राहिलात तर मला करावे लागणार नाहीं. छात्रालय म्हणजे माझें घर. या घरात घाण दिसली तर ती मी दूर करणें माझें कर्तव्य आहे. तें मी करीत राहीन. जे मी करु नये असें तुम्हाला वाटतें, तें मला करावयास लावण्याची वेळच आणू नका. समजलें ना?” स्वामींनी विचारलें.
“चादर धुऊन लौकर फाटली तर,” एकानें विचारले.
“कांदिलाची कांच पुसतां पुसतां फुटली तर,” दुस-यांनें विचारले.
“रोज आंघोळ करून हे शरीर का फांटते? तसे असेल तर रोज आंघोळहि करूं नका. अरे, सा-या वस्तु फांटावयाच्याच आहेत व फुटावयाच्याच आहेत. जोपर्यंत त्या टिकतील तोंपर्यंत त्यांना तेजस्वी व स्वच्छ ठेवा म्हणजे झालें. तुमची कांच पुसतांना माझ्याहातून फुटली तर मी भरून देईन. चादर धुऊन फाटली तर शिवून देईन. आणखी मी काय करू? समजलेत ना?” स्वामी खिन्न होऊन म्हणाले.
स्वामींची खिन्न मुद्रा पाहून मुलांनी माना खालीं घातल्या. त्या थोर पुरुषाचें विचारतां कांही तरी वेडेवांकडेंहि विचारुं लागतों. तुम्ही रागावूं नका. आम्ही तुमचींच ना मुलें. तुम्ही पुन्हा आमच्याकडे पाहून एकदा हंसा. तुमचें गोड हंसणें आम्ही कुठेंहि गेलों तरी विसरणार नाही,” मुकुंदा म्हणाला.
स्वामींना हसू आलें. ढग गेले. सूर्यप्रकाश आला. गंभीर वातावरण जाऊन पुन्हा खेळीमेळी सुरु झाली.