वेणूनें हें पद घोळून घोळून म्हटलें. प्रार्थना झाल्यावर ती स्तब्धपणें घरीं निघून गेली. अंथरुणांत पडली. पडून रडली. विचारसिंधूंत, भावनासिंधूंत बुडाली. माझे डोळे ! त्यांच्या डोळ्यांपेक्षां का माझे डोळे सुंदर आहेत ? त्यांच्या डोळ्यांना भूल पाडतील असे आहेत माझे डोळे ? त्यांच्या डोळ्यांनीं मला भूल पडली व माझ्या डोळ्यांनीं त्यांना भूल पडली. त्यांच्या डोळ्यांपेक्षा माझेच डोळे सुंदर आहेत. त्यांच्या डोळ्यांतील सौंदर्य मीं पिऊन टाकलें आहे. त्यांच्या डोळ्यांतील तेज मीं ओढून घेतलें आहे. रघुनाथ त्यांच्या गोष्टी सांगे. मी त्यांची कल्पना करीत असे. त्यांना मनांत निर्मीत असे. त्यांना प्रत्यक्ष पाहिलें. माझे डोळे म्हणून मोठे झाले. किनरीवाला म्हणे, ‘असे डोळे मीं पाहिले नाहींत.’ खरेंच का माझे डोळे फार गोड झाले आहेत ? होय. गोड वस्तु पाहून गोड कां नाहीं होणार ? हिरव्या गवतांतील किडा हिरवा होतो. जें पाहावें तसें आपण होतों. त्यांचे डोळे पाहून, त्यांचें तोंड पाहून माझे डोळे सुंदर झाले, मोठे झाले ! तुमच्यापेक्षां सुरेख आहेत हो माझे डोळे ! याल तेव्हां पाहाल ! तुमच्या डोळ्यांपेक्षा काळेभोर, तुमच्या डोळ्यांपेक्षां गोड, तुमच्या डोळ्यांपेक्षा मोठे माझे डोळे ! माझ्या ह्या मोठ्या डोळ्यांनी तुम्हाला एकदम सांठवीन, एकदम पिईन. होऊं देत माझे डोळे मोठे, होऊं देत गोड, होऊं देत सुंदर सुंदर !

वेणू अंथरुणांत क्षणांत निजे, क्षणांत उठून बसे. अंधारांत ती का कोणाला पाहात होती ? तिला का कोणी दिसत होतें ? निजली. पडली पुन्हां. नीज, वेणू, नीज. इतकी अशांति बरी नव्हे. म्यांव, म्यांव ! गुर् गुर् गुर्—म्यांव म्यांव ! अरे मांजरें भांडताहेत ! वेणूची तंद्री मोडली. ती भ्यायलीं. तिनें अंगावरून आईची चौघडी घेतली ! नीज, वेणू, नीज. मोठे डोळे मिटून नीज. डोळ्यांना फार शिणवूं नको. नीज, मीट, डोळे मीट ! मोठे डोळे मीट.

प्रभात झाली. वेणूची आई दळू लागली. राममंदिरांत प्रार्थना सुरू झाली. वेणू निजली होती. आईनें तिला हांक मारली नाही. भिका बोलवायला आला नाहीं. कोंबड्यानें जागें केलें नाही, वार्‍यानें हलवलें नाहीं. सारी सृष्टी म्हणत होती, ‘नीज, वेणू, नीज. गोड डोळे मिटून नीज. मोठे डोळे मिटून नीज.’

बाहेर चांगलेंच उजाडलें. फुलें फुललीं. गायी रानांत गेल्या. पांखरें आकाशांत उडालीं. मुलें शाळेंत गेलीं. वेणू निजलेलीच होती. जागी झाली. वेणू जागी झाली. डोळे चोळू नको इतके वेणू. हळूच डोळे उघड. मिटलेले डोळे हळूच उघड. किती चोळतेस ? हे काय ? काय झालें ? वेणू रडायला लागली. तिनें ‘ए आई, आई ग, आई’ हांक फोडली !

“काय, वेण्ये ? काय ग झालें ? स्वप्न का पाहिलेंस ? ऊठ,” आई संबोधू लागली.

“आई ! मला काही दिसत नाही. आई ! तुझें तोंड मला दिसत नाहीं. तुझे हात मला दिसत नाहींत. हें काय ? कांहीं नाहीं. काय झालें डोळ्यांना ? चिकटलेले नाहींत. काही नाहीं. आई, माझे डोळे !” वेणू रडू लागली.

“थांब, मी कढत पाणी आणतें. त्यानें धू. असे चोळू नको. रडूं नको.” असें म्हणून आई चुलीजवळ गेली.

वेणू डोळे फाडफाडून पाहात होती ! कांही नाहीं. उजेड दिसेना, झाडें दिसत ना, घरांतील वस्तु दिसेना. “माझे डोळे ! आई ! माझे डोळे !”

आई पाणी घेऊन आली. फडका कढत पाण्यांत बुडवून आई डोळे पुसू लागली, स्वच्छ करूं लागली !

“अग आई ! ते चिकटले नाहींत. चांगले उघडे आहेत. परंतु दिसत नाहीं. मला कांहीं दिसत नाहीं आई. कोठे गेले तुझ्या वेणूचे डोळे ? कोणीं नेले, कोणी चोरले ? माझे मोठे डोळे ! आई मी काय करूं ?” वेणू रडूं लागली. आई रडूं लागलीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel