गोपाळराव म्हणाले, “शिव्याशापहि मिळत असतील”

स्वामी म्हणाले, “सारे संमिश्र आहे. अंधार व उजेड, दिवस व रात्र. जगांत केवळ आनंद नाही, केवळ दु:ख नाही. आणि म्हणूनच गोडी आहे. मनुष्याला केवळ आंबट आवडत नाही. केवळ गोड आवडत नाही. मनुष्याला आंबट गोड आवडत असते.”

दिपवाळीची सुट्टी असल्यामुळे मुलें दु:खानें घरी गेली होती. गोपाळरावांना जरा बरें वाटत नव्हतें. त्यांना हिवंताप येत होता. स्वामी मधून मधून चौकशी करुन जात. एके दिवशी सकाळीं गोपाळरावांची चौकशी करण्यासाठी म्हणून स्वामी गेले. ते दरवाजाजवळ जातात, तों त्यांना काय दिसलें? गोपाळरावांच्या खोलीच्या दरवाजांतच स्वामी उभे राहिलें. त्यांच्यानें आंत पाऊल टाकवेना. तें दिव्य दर्शन होतें. पवित्र दर्शन होतें.  गोपाळराव घळघळ अश्रू ढाळीत होते! अश्रूंची टवाळी करणा-या गोपाळरावांच्या डोळ्यांत मोत्यासारखे अश्रू! या मनुष्याचें हृदय आहे तरी काय? वरुन ओबड धोबड परंतु आंत रसाळ आहे हा पुरुष. दगडाच्या आंत गुप्तगंगा आहे; वरून कठोर परंतु आंत प्रेमाचे झरे आहेत. ती पावन गंभीरता भंगावी असें स्वामींस वाटलें नाही. पवित्र दुर्वांकुरांवरील स्वच्छ दंवाचे बिंदु-ते पाहाण्यांतच धन्यता व सुंदरता असते.

आवाज न करता स्वामी माघारे गेले. त्या पातळ, दुबळ्या अश्रूंनीं स्वामी व गोपाळराव यांना कायमचें जोडलें, अभंग जोडलें. अश्रू हे जोडणारे आहेत. दगडांना जोडणारें अश्रूसारखें सिमेंट दुसरें कोणतें आहे? स्वामींची गोपाळरावावर भन्ति बसली, प्रेम बसलें. गोपाळरावांस पाहावें, वरचेवर पाहावें; दुरून प्रेमानें पाहावें असें त्यांना वाटे. स्वामीजी कधी फुलें तोडीत नसत, परंतु गोपाळरावांना फुलें आवडत म्हणन कधी कधीं हलक्या हातानें सुंदर, सुगंधी फुलें तोडून स्वामी त्यांच्या टेबलावर त्यांना नकळत नेऊन ठेवीत. देवाला नकळत त्याची पूजा करीत.

स्वामी नेहमी छात्रालयांतच जेवत असत. ते कधी जेवत, कधी जेवतहिनसत. ज्या दिवशी त्यांचें मन खिन्न असें, विषण्ण असे, त्या दिवशीं ते जेवणाला टाळा देत. ते म्हणत, ‘जेवताना मन प्रसन्न असावें. ज्या दिवशीं मन अप्रसन्न असेल त्या दिवशीं जेवू नये. अप्रसन्न व अशांत मन असताना घेतलेलें अन्न विषाप्रमाणे होईल. त्या अन्नानें शरिरास पुष्टी मिळणार नाही!’ एखादे दिवशीं ते म्हणत, ‘रोज उठून काय जेवायचें! कधी कधीं या जेवण्याचा मला कंटाळा येतो!”

एके दिवशीं अकस्मात् स्वामींच्या खोलींत गोपाळराव आले. गोपाळराव असे मधूनमधून स्वामींकडे येत असत. ते फार बोलत नसत. नुसते येऊन जात. जणुं त्या खोलींतील प्रेम व माधुर्य प्यावयास ते येत असत.
“काय गोपाळराव?” स्वामींनी विचारलें.

“मी तुम्हाला एक प्रार्थना करावयाला आलों आहे,” गोपाळराव म्हणाले.

“आज्ञा करावयास आलों आहे असें म्हणा,” स्वामी म्हणाले.

“तितकें प्रेम माझ्याजवळ कोठें आहे? प्रेम मारूं शकतें, आज्ञा करुं शकतें,” गोपाळराव म्हणाले.

“मी तुमच्यासाठी काय करुं?” स्वामीनीं विचारलें.

“तुम्ही छात्रालयांत न जेवतां माझ्याकडेच उद्यांपासून जेवायला येत जा. मी तुम्हाला नको सांगेपर्यंत माझ्याकडेच जेवायचे,” गोपाळराव म्हणाले.

“कां बरे!” स्वामीनीं कुतूहलपूर्वक विचारलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel