ते व्याख्यानाला होताहोईतों जात नसत. कधी गेलेच तर पाचदहा मिनिटें फार तर बसावयाचे. ‘चला हो, काय ऐकता पोकळ शब्द? आपण डिक्शनरी चाळू, पुष्कळ शब्द मिळतील,’ असें ते म्हणावयाचे, गोपाळराव म्हणत, ‘मी एकच व्याख्यान पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकलें आहे व तें म्हणजे लोकमान्य टिळकांचे!” लोकमान्यांबद्दल गोपाळरावांस फार भक्ति वाटे. परंतु ते सहज एकदां म्हणाले, ‘लोकमान्यांचे चारित्र्य व लोकमान्यांची बुद्धिमत्ता यांना तुलना नाही हें खरें, पण लोकमान्यांनी महाराष्ट्रात भांडखोरपणाहि वाढविला आहे. अनादरबुद्धि वाढविली आहे. लोकमान्यांच्या अलौकिक त्यागामुळे, धडाडीमुळे, ध्येयोत्कटतेमुळे, देशभक्तीच्या एकतानतमळे तो भांडखोरपणा त्यांना साजे. परंतु त्यांच्या मरणानखर त्यांच्या अनुयायांनी अनुदारपणा व भांडखोरपणा मात्र ठेविला आहे, आणि ध्येयोत्कटता व देशभक्तीची एकतानता यांना फाटा दिला आहे. इतर प्रात नवीन इतिहास निर्माण करीत आहेत, आणि आम्ही गतइतिहासाचेच फक्त पोवाडे म्हणत बसलों आहोंत!’
महात्मा गांधी म्हणजे गोपाळरावांची श्रुतिस्मृति होती. ते म्हणत, १९१९ साल आलें व माझ्या जीवनांत खरी क्रांति झाली. साहेबाचा मी साधा मनुष्य झाली. बूटसूट जाऊन साधा सदरा अंगावर आला.’ महात्माजीचा यंग इंडिया केव्हा येतो याची ते वाट पाहात असत. महात्माजीनीं लिहिलेले अक्षरन् अक्षर वाचण्यासाठी त्यांना तहान असे. जो गृहस्थ इतर शब्दवेल्हाळांची वाडें जाळावयास तयार होत असे, तोच महात्माजीचा शब्दन शब्द वाचण्यासाठी तडफडत असे. कां बरे? कारण महात्माजींच्या शब्दापाठीमागें, लिहिलेल्या अक्षरापाठीमागे त्यांची चाळीस वर्षांची सेवा होती. प्रत्येक श्वासोच्छवास ज्यांचा देशाच्या सेवेंत जात आहे अशा महात्मांचे तें लिहिणें होतें. ते लिहिणें म्हणजे आवड नव्हती, करमणूक नव्हती. ते लिहिणें म्हणजे आत्मदर्शन होतें. लिहावयास पाहिजे म्हणूनच तें लिहिलेलें असे. न लिहितां भागलें असतें तर महात्माजींनी लिहिण्यांत वेळ दवडला नसता. त्यांचे लिहिणे म्हणजे ध्येयभेटीचे प्रयोग होते, सत्यदेवाच्या प्राप्तीचे अनुभव होते. महात्माजीचें लिहिणें म्हणजेच खरी सत्यनारायाची पोथी.
गोपाळरावांना केसरी आवडतनासा झाला. ‘टिळकांच्या बरोबर महाराष्ट्राला पुढे नेणारा केसरी मेला. महाराष्ट्राला मागें ओढणारा केसरीच्या नावानें हा कोणी तोतया आहे,’ असें ते म्हणत. तेजोभंगाचे धडे देणे व सर्वांवर टीका करणे हेंच आता केसरीचे उद्दिष्ट. नवीन ध्येयदर्शन नाही, नवीन राष्ट्राला हाक नाही. उत्कटतेचा संदेश नाही, विशाल दृष्टीची भेट नाही. खरा केसरी उडी मारतो, त्यागाला मिठी मारतो, युगप्रवर्तळ व पथप्रर्वतळ असतो. आजच्या केसरीला हृदय नाही, व बुद्धि आहे तीहि जड व जरठ झालेली महात्माजींची केसरींत येणारी निंदा पाहून गोपाळराव कधी कधी फार चिडत, चवताळत, त्या केसरीचा चोळामोळा करीत. ती विषारी कुचकट विचारसरणी पाहून त्यांचे पित्त फार खवळे.
‘न केवलं यो महतोऽपभाषते
श्रृणोति तस्मादपि सोपिऽपि पापभाक |
जो महात्म्यांची अखंड निंदा करतो, तो तर पाणी होतोच, परंतु ती निंदा ऐकणाराहि त्या पापांत भागीदार,’ असें ते म्हणावयाचे.
एके दिवशी लोकमान्यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रसंगाच्या निमित्ताने केसरींत महात्माजींवर गलिच्छ टीका आली होती. गोपाळरावांचे डोळे लाल झाले. ते शाळेंतील शिक्षकालयांत बसलेले होते. बोटें थरथरत होतीं. त्यांनी तो केसरी टरकन् फाडला व फेंकून दिला. परंतु इतक्यांत त्यांची कर्तव्यबुद्धि जागृत झाली. ते म्हणाले, ‘हा शाळेचा सार्वजनिक केसरी! हा फाडावयाचा मला काय अधिकार आहे?’ त्यांनी लगेच एक दुसरा केसरी मागवून घेतला व तेथें आणून ठेवला.
गोपाळरावांची कर्तव्यनिष्ठा जाज्वल्य होती. सार्वजनिक जीवनाचें पावित्र्य ते ओळखीत. अंगांत ताप असला तरी ते शिकवावयास जात. एकदा १०३ डिग्री ताप असतांहि ते शाळेंत शिकवावयास गेले. तापानें त्यांचें तोंड लाल झालें होतें. इतर शिक्षक म्हणाले, “गोपाळराव आज नका जाऊ वर्गांवर तुम्ही घरी जा, नाही तर येथें पडून रहा.”
गोपाळराव म्हणाले, “मी वर्गांत शिकवताना पडलों तर मग मला येथें उचलून आणून झोंपवा. कर्म करती असताना मला पडू दें. कर्मक्षेत्रावरचा मी शिपाई,”