त्या खोलीतील केर कोणीच काढीना. यशवंत आपलें अथरुणहि गुंडाळीत नसे, एके दिवशी तो आपल्या खोलींतील मुलांस म्हणाला, “माझे गुंडाळा रे अथरुण. मी तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे. मी जहागीरदार आहे. तुम्हांला माहीत नाही का?”
“अरे, श्रीमंत असलास तर घऱचा. येथे आपण सारे सारखे, तुझे कांही आम्ही नाकर नाही, समजलास?” तो मुलगा म्हणाला.
मुलांची आंघोळी करण्याची वेळ होती. स्वामी सहज यशवंताच्या खोलीत गेले. तेथे गादी तशीच पडलेली, जिकडेतिकडे केर साचलेला स्वामीना वाईट वाटलें. त्यांनी अथरुण नीट गुडाळले. कोप-यांतील केरसुणी घेऊन ते केर काढू लागले.
यशवंत खोलींत शिरतो तो तें गंभीर दृश्य.
“तुम्ही कशाला केर काढता? ती मुलें काढतील,” यशवंत म्हणाला.
“मी काढला म्हणून काय झाले?” स्वामीनीं विचारले.
“तुम्ही मोठे आहात,” यशवंत म्हणाला.
“केर न काढणारा तो मोठा अशी का तुझी समजूत आहे?” स्वामीनीं विचारलें.
“मोठी माणसें अशी कामे करीत नाहीत,” तो म्हणाला.
“यशवंत, तू महात्माजीचें नांव ऐकलें आहेस का?” स्वामीनीं विचारलें
“हो,” तो म्हणाला.
“ते मोठे आहेत कीं नाही?”
“जगांतील सर्वांत थोर पुरूष त्यांना म्हणतात,” यशवंत म्हणाला.
“परंतु त्यांनी कितीदां रस्ते झाडले, कितीदा शौचकप स्वच्छ केले. तुला माहीत आहे? सेवा करुन महात्माजी मोठे झाले. सूर्य, चंद्र, तारे, वारे जगांतील अंधार व घाण सदैव दूर करीत असतात. नद्या घाण वाहून नेत असतात. आई मुलांची घाण दूर करते. काम टाळल्याने कोणी मोठे होत नाही. यशवंत, श्रीकृष्ण परमात्मा धर्मराजाच्या राजसुय यज्ञाचे वेळीं उष्टीं काढी व शेण लावी, तो अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा करी माहीत आहे?”
“हो,” यशवंत म्हणाला.
“अरे, प्रत्यक्ष भगवानाचे हात जर घाण दूर करतात, तर आपले हात का त्यांच्या हातांपेक्षा पवित्र व थोर? ज्याचे हात काम करतील, त्याचे हात देवाला आवडतात. जो हात श्रमतो, त्यालाच खाण्याचा अधिकार आहे. नाठाळ, दूध न देणा-या भाकड गुराला का कोणी प्रेमानें चारा देतो? त्याप्रमाणें समाजाची सेवा न करणारा, समाजाला भाररूप अशा माणसाला काय म्हणून खायला द्यावे?”