“श्रमजीवनाला न कंटाळणा-या माणसाचे पुस्तक मला पूज्य आहे. जो प्रेमाने व आस्थेने खेडी स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू आनंदाने घेतो, त्याची लेखणीची मला आदरणीय आहे. ती लेखणीही लोकांची मने झाडण्यासाठीच असेल. केवळ शब्दवेल्हाळांची लेखणी मला तिरस्करणीय वाटते. कर्मशून्य झब्बूंची प्रवचने व पलंगपंडितांचे आढ्यतेचे उपदेशाचे घुटके हे मला अत्यंत किळसवाणे वाटतात. द्या तुमचे पुस्तक. ते खपेल. निदान खानदेशात तरी खपेल. माझ्या अंगावर पडणार नाही, असा माझा विश्वास आहे,” गोपाळराव म्हणाले.
“मग द्या शंभर रुपये,” स्वामी म्हणाले.
“परंतु शंभर रुपये एकदम त्या मुलाच्या हाती देऊ नका. येथे माझी बुद्धि थोडा वापरा. ते जेथे शिकायला जाणार असतील, तेथील चालकांशी पत्रव्यवहार करा. महिना दोघांचा सर्व खर्च काय येतो त्याची माहिती मिळवा आणि दरमहा तेथे ते पैसे त्या चालकांकडेच तुम्ही पाठवीत जा,” गोपाळराव म्हणाले.
जामकू व भिका हे विणकाम शिकण्यासाठी गेले. स्वामी देवापूरला जाऊन आले. तेशील लोकांना सूत कातण्याबद्दल ते सांगून आले. ‘तुमच्या गावाला महत्त्व द्या. नवीन तीर्थक्षेत्र करा. बाहेरचे लोक तुमचे गाव पहायला येतील.’ किती तरी त्या दिवशी त्यांनी गोष्टी सांगितल्या. रघुनाथच्या आईकडेच ते उतरले होते. वेणू टकळीवर सूत कातावयास शिकली होती.
“वेणू! गावातील मुलींना, बायकांना तू सूत कातावयाला शिकविले पाहिजे बरे का?” स्वामी म्हणाले.
“हो, शिकवीन. मी माझ्या हातच्या सुताचे आता पातळ नेसेन? खरेच!” वेणू म्हणाली.
“रघुनाथचे पत्र केव्हा आले होते?” स्वामींनी विचारले.
“आले होते. तो दिवाळीला काही येणार नाही. मग मी कोणाला ओवाळू?” वेणूने विचारले.
“वेणू! बाबा केव्हा आले होते?” स्वामींनी विचारले.
“ते आता येत नाहीत. आम्हाला दाणे पाठवीत नाहीत. काही नाही,” वेणू म्हणाली.
“मग तुम्ही काय करता?” स्वामींनी विचारले.
“कोणाचे दळतो, मजुरी करतो. रघुनाथभाऊने पाच रुपये पाठविले होते,” वेणू म्हणाली.
“त्यांतील काही शिल्लक आहेत?” त्यांनी प्रश्न केला.
“काही नाही. वाण्याचे दिले,” वेणू म्हणाली.
“मग हे पाच रुपये घेऊन ठेव, म्हणजे तितकी अडचण वाटणार नाही,” स्वामी म्हणाले.