“तुम्ही छात्रालयांत वेळच्यावेळीं जेवत नाही. कोणाला कांही कळत नाही. माझ्याकडे जेवायला येऊं लागलेत म्हणजे रोजची हजेरी, गैरहजेरी कळत जाईल. कां जेवलेत नाहीं तें विचारता येईल. तुम्ही प्रकृतीची काळजी घेत नाही,” गोपाळराव म्हणाले.
“मी कधी आजारी पडत नाहीं. प्रकृतीची फार काळजी घेऊन तरी काय करायचे,” स्वामीनीं विचारलें.
“सेवा करावयाची तुमची सर्वांना जरूर आहे. तुम्ही शेंकडो मुलांचे आहात. खानदेशांतील मुलांचे आहात. तुम्ही त्यांना प्रेमामृताचें, ऐक्यामृताचें भोजन द्यावयास जिवंत राहिलें पाहिजे. तुम्ही आमची-आशा, तुम्ही आमची स्फूर्ति. तुम्हाला माहीत नाहीं. तुमच्यावर तुमची सत्ता नसून आमची आहे. मुलांच्या संमतीनेंच मी तुम्हाला जेवायचें कायमचें आमंत्रण देत आहे. नामदेव, यशवंत, रघुनाथ, जनार्दन, मुकुंदा, नरहर सारे असेंच म्हणाले. मग येणार ना?” गोपाळरावांनी पुन्हां विचारलें.
“हो,” स्वामी म्हणाले.
स्वामी गोपाळरावांकडे जेवाववास जाऊं लागलें. बारीक सारीक गोष्टी स्वामींच्या लक्ष्यांत येत. गोपाळरावांच्या पत्नी गोदूताई किती मनापासून पतीची सेवा करीत. परंतु गोपाळराव पत्नीशीं प्रेमानें, प्रसन्नतेनें कधी बोलले आहेत असें होत नसे. गोपाळराव जेवावयास नसले म्हणजे गोदूताई भाजी वगैरे करीत नसत. एकट्यासाठी कशाला? परंतु गोपाळरावांसाठी त्या सर्व कांही करावयाच्या.
“भाजी चांगली झाली आहे का?” गोदूताई विचारीत.
परंतु गोपाळराव कांही बोलत नसत. ‘होय, चांगली झाली आहे.’ अशा एका गोड वाक्यानें गोदूताईंना कृतार्थ वाटलें असतें. परंतु गोपाळराव कृपण होते. कुणालाहि चांगले म्हणण्यात ते कंजूष होते. गोदूताईंच्या हृदयाची भूक त्यांना काय माहीत? या जगांत एका स्मितानें, एक प्रेमळ दृष्टीक्षेपानें, एका गोड शब्दाने केवढें समाधान दुस-याला देता येते? परंतु हृदयशून्य लोक त्याचा विचार करीत नाहीत. सहानुभूतीचा अभाव हा हिंदूस्थानचा रोग आहे. दुस-याच्या मनोभावनांचा, दुस-याला माझ्या कृत्यांनी काय वाटत असेल याचा आपण कधीहि विचार करीत नाही. सहानुभूति जेथे नाही तेथें काय आहे? सहानुभूतिहीन व्यवहार म्हणजे सारहीन भुसा होय!”
गोदूबाई पतीच्या इच्छेविरुद्ध कधी जात नसत. सारा हिशेब वगैरे त्या ठेवती. घऱांत आदर्श स्वच्छता राखीत. सारे नीटनेटके, सुंदर त्यांचें करणें. परंतु गोपाळराव कधीं सहानुभूति दाखवीत नसत. स्वामींचें हृदय दु:खी झालें. दुस-यांच्या भावना पाहाण्याची त्यांना संवय झाली होती. आपल्या वर्तनानें दुस-याच्या जीवाला काय वाटेल याचें परीक्षण स्वामी सदैव करीत.
एके दिवशी स्वामीनीं दैनिकांत ‘दुस-याचें हृदय’ म्हणून एक लेक लिहिला गोपाळरावहि बहुतेक नियमानें दैनिक वाचीत असत. त्या दिवत्रीचें दैनिक गोपाळरावांच्या हृदयास हलवितें झालें. डोळ्यांना आलें करितें झालें. जेवताना गोपाळराव स्वामीसं म्हणाले, “आजचें तुमचें दैनिक जीवनांत क्रांति घडविणारें आहे.”
“क्रांति दिसू दे,” स्वामी म्हणाले.
“भाजी कशी झाली आहे? चांगली झाली आहे का?” गोदूताईंनी विचारले.
“ चांगली झाली आहे,” गोपाळराव म्हणाले.
गोदूताईंच्या तोंडावर ते दोन शब्द ऐकून केवढे समाधान दिसलें!