“आणि माझ्याजवळ नको का रे काहीं?” गोपाळराव म्हणाले.
“तुम्हाला तर मोठी वस्तु आणावयाची आहे,” नामदेव म्हणाला.
“कोणती?” गोपाळरावांनी विचारलें.
“या स्वामीजींना तुम्ही आणा.” नामदेव हंसत म्हणाला.
“अरे, मी किती काटकुळा आहे? त्यांना मी कसें आणू?” गोपाळराव म्हणाले.
“परंतु तुमची इच्छाशक्ति दांडगी आहे,” स्वामी म्हणाले.
“आम्ही जातों. स्वामी! जातों हां.” दोघे म्हणाले.
गेले, दोन्ही पक्षी पुढे उडून गेले. छात्रालयांतील मुलें एकदम त्यांच्या भोवंती जमू लागली. त्यांच्याजवळ चौकशी करु लागली.
“ही त्यांची का रे पिशवी?” एकानें विचारलें.
“आपण पाहूं तिच्यांत का आहे ते,” दुसरा म्हणाला.
“त्यांच्या परवानगीशिवाय आपण त्यांची पिशवी पाहाणे योग्य होणार नाही. तो विश्वासघात होईल.” नामदेव म्हणाला.
“अरे, अशा पुरुषांजवळ आंत बाहेर कांही नसतें. त्यांचा सारा मोकळा संसार असतो,’ एक प्रौढ मुलगा म्हणाला.
“आणि ही त्यांची घोंगडी वाटते?” एकानें चौकशी केली.
“आपण सारीं मुलें दरवाजाजवळ रांगेनें उभी राहूं या. स्वामीजी व गुरुजी येतील, त्यावेळेस आपण टाळ्यांचा गजर करु,” रघुनाथानें सुचविलें.
“मी लौकर एक फुलांची माळ करतो,” नामदेव म्हणाला.
“खरेंच. चला आपण फुलें तोंडू. नामदेव चल,” वासुदेव म्हणाला.
“येथला कचरा झाडून टाकला पाहिजे. आपण हें सारें स्वच्छ करुन ठेवं या,” रघुनाथ म्हणाला.