“तुम्हाला का त्रास आमच्यासाठी?” वेणूने विचारले.
“तुम्ही माझ्या आश्रमातील म्हणून. आपण सारी एका आश्रमातील धडपडणारी देवाची मुले, भारतमातेची मुले,” स्वामी म्हणाले.
“आम्ही आश्रमांत राहू?” वेणूने विचारले.
“पुढे रघुनाथभाऊचे शिकणे वगैरे झाले म्हणजे. तो पर्यंत हे घर म्हणजेच तुमचा आश्रम. प्रर्थना करीत जा. आईचे काम करून वेळ मिळेल तेव्हा वाचीत जा, कातींत जा. भिका वगैरे आले म्हणजे पिजणेहि शीक. समजले ना? आमची वेणू चांगली होवो,” स्वामी प्रेमाने म्हणाले.
“होईन. मी चांगली होईन,” वेणू म्हणाली.
गोपाळरावांनी स्वामींचे पुस्तक छापले. छात्रालयांतच शंभरसवाशे प्रति खपल्या. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी घेतल्या. त्या पुस्तकावर चांगले अभिप्राय आले. गोपाळराव जळगावला गेले होते. तेथे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षणाधिका-यांना ते भेटले. ते शिक्षणाधिकारी म्हणाले, “तुम्ही येण्यापूर्वीच ते पुस्तक मी वाचले. येथे कोणीतरी विद्यार्थी विकावयास आला होता. ते पुस्तक मला फारच आवडले. पोळ्याची गोष्ट, शेतक-याचा संसार वगैरे गोष्टी कोणालाहि चटका लावतील. आणि भाषा किती गोड आहे! दोनदोन तीनतीन शब्दांची वाक्ये. साधी, परंतु हृदयाची पकड घेतात. झिमझिम सुंदर पाऊस पडत आहे व हृदयभूमी फुलून येत आहे असे वाटते. जिल्हा लोकल बोर्डाच्या जवळजवळ आठशे शाळा आहेत. प्रत्येक शाळेत काही आमची लायब्ररी नाही. तरी पण शंभर प्रती मी खरेदी करून शंभर मोठ्या शाळांच्या लायब्र-यांसाठी देणार आहे. तुम्ही नसता आलात तरीही मी घेणारच होतो. हे स्वामी कोण?”
“मलाहि त्यांची फारशी माहिती नाही. अमळनेरला तीन वर्षांपासून आले. सहज भेटले. मी म्हटले, ‘आमच्या छात्रालयांत राहा.’ ते राहिले. जशा काही योगायोगाच्या गोष्टी. परंतु त्यांचा मुलांना पुष्कळच फायदा होतो. मी त्यांना त्यांची पूर्वकथा फारशी विचारीत नाही,” गोपाळराव म्हणाले.
“ते बरोबर. अशी माणसे थोडी लहरी असतात. एखादे वेळेस एकदम बिनसावयाचे की चालले. मिळेल तेवढा फायदा अशा विचरणा-या मेघापासून करून घेतला पाहिजे,” ते गृहस्थ म्हणाले.
गोपाळराव खटपटी मनुष्य होते. त्यांनी इतर जिल्हा लोकल बोर्डांना सुद्धा लिहिले. पुस्तकाला सरकारी मजुरी मिळाली होती. त्यामुळे पुस्तकांचा शाळांतून प्रचार व्हावयास उशीर झाला नाही. स्वामींनी नामदेवाकडे पाच पुस्तके पाठविली होती. नामदेव, रघुनाथ सर्वांनाच ते पुस्तक आवडले.
नामदेवाने स्वामींना लिहिले:--
“किती गोड पुस्तक. प्रत्येक शब्दांत तुम्हीच आम्हांस दिसता
‘जेथे तेथे देखे तुझीच पाऊले।
सर्वत्र संचारले तुझे रूप।।’