“महाराष्ट्रांतील एका प्रसिद्ध कादंबराकारांचें एक पुस्तक वाचून खानदेशांतील ऐक खेड्यांतील प्रचारक दुःखानें म्हणाला, ‘यांत आमचें कुठेंच कांही नाही.’ यांत आमचें कुठेंच काही नाही हे शब्द माझ्या हृदयात जळजळीत निखार्‍याप्रमाणें चर्र करीत गेले. कांही कवी शेतकर्‍यांचे चार उसने शब्द काव्यांत वापरून आपण शेतकर्‍यांचे कवि झालों असें मनांत मानीत असतात. परंतु असल्या सोंगांनीं त्या कोट्यवधि जनतेचे कवि होता येणार नाहीं. तुमचें आंतडें तुटतें का, तुमचें हृदय भडकतें का, डोळे भरतात का, सुखविलास आपोआप दूर फेकले जातात का, खानपान मेजवानी विसरता का ? हे जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रांतील कोट्यवधि गोरगरिबांचे कैवारी कवि नाहीं. तुम्ही चार सुखी श्रीमंत लोकांचेच कवि आहात !

“हे राष्ट्र जगायला हवे असेल तर राष्ट्राच्या मूळाला पाणी घालावयास सर्वांनी उठलें पाहिजे. कमळाला फुलवावयाचे असेल तर खालचा देठ शाबूत हवा. पांढरपेशांची मुखकमळें अजून टवटवीत आहेत. हीं मुखकमळें कोट्यवधि खेड्यांतील जनतेच्या जीवनावर लटकलेली आहेत. हा खेड्यांतील जनतारूपी देंठ चिखलांत, शेवाळांत धडपडत आहे. तेथला ओलावा कमी होत आहे. हा देंठ सुकेल, गळून पडेल; आणि हीं वरची हंसणारी पांढरपेशी कमळें, तीहि धुळींत पडतील !

“महापुरुष या देठांची काळजी घ्यावयाला बोलावीत आहेत. महात्माजी, जवाहरलाल तुम्हा कलावंतांना हांका मारीत आहेत. युगपुरुषांच्या हांकेला ओ द्या. काळपुरुषाची हांक ऐका. राष्ट्राची नवीन ध्येयें रंगवून, नटवून घरोघर न्या. ध्येयाचे दीपक घरोघर लावा. अंधार दूर करा. अंधार दूर करणें, आनंद निर्माण करणें, दुःख दैन्य निराशा झडझडून दूर करणें, ध्येयपूजेला सर्वांना चैतन्य, स्फूर्ति व उत्साह देणें हें तुमचें काम आहे ! हें काम हातीं घ्या व कृतकृत्य व्हा. हें ध्येय हातीं घ्या व भारतमातेला हंसवा.”

टाळ्यांचा सारखा गजर होत होता. चिटणीस उभे राहिले. ते म्हणाले, “तुम्हांला अमृताची मेजवाणी मिळाली आहे. इतकें भावनोत्कट व विचारप्रवर्तक व्याख्यान या सभागृहांत तुम्हीं क्वचित् ऐकलें असेल. हे हृदयाचे बोल होते. हें व्याख्यान म्हणजे एक दिव्य गीतच होतें. आपण सारे उंच वातावरणांत गेलेलो आहोत. तेथूनच आपण आजच्या थोर वक्त्यांवर आभारांची पुष्पवृष्टि करू या. तुमच्या सर्वांच्यावतीनें हा फुलांचा हार त्यांना मी अर्पण करतो.”

सभा संपली. कॉलेजांतील आचार्यांशी थोडावेळ बोल चालणें झालें. नामदेव, रघुनाथ व इतर अनेक खानदेशांतील मुलें स्वामींच्याभोंवती गोळा झालीं. मोठा प्रेमळ देखावा तो होता. खानदेशांतून लोणी व तूप पुण्याला येतें, परंतु खानदेशांतून तेजस्वी विचारांचे साजूक तूप आज प्रथमच पुण्यास आलें होतें. त्यांना कृतार्थ वाटत होतें. मुलांना अभिमान वाटत होता.

स्वामी नामदेव व रघुनाथ यांच्याबरोबर फिरावयास गेले.

“चला पर्वतीवर जाऊ,” नामदेव म्हणाला.

“उंच वातावरणांत जाऊ,” रघुनाथ म्हणाला.

“किती दिवसांनी मी पुन्हा पर्वतीवर जाणार आहे !” स्वामी म्हणाले.

“तुमचे व्याख्यान किती सुंदर झालें !” नामदेव म्हणाला.

“तुम्हीं नामदेवाला पाहिलें की नाहीं ?” रघुनाथनें विचारलें.

“नामदेवालाच विचारा,” स्वामी म्हणाले.

“मी स्वामींना पाहात होतो. ते मला पाहात होते का नाहीं ते मला माहीत नाही,” नामदेव म्हणाला.

“सारें तन्मय झालें होतें,” रघुनाथ म्हणाला.

“माझे सारें तुम्हाला गोडच वाटतें. स्तुतिस्तोत्र पुरें,” स्वामी म्हणाले.

“आम्हाला खरोखर वाटतें तें आम्ही बोलू नये का ?” नामदेवानें विचारलें.

“ती पाहा मुले कीती उड्या मारीत जात आहेत,” स्वामी म्हणाले.

“पर्वतीवर आपण पळत चढावयाचें का ?” रघुनाथनें विचारलें.

“हो. माझी तयारी आहे,” स्वामी म्हणाले.

“नको. तुम्ही दमाल,” नामदेव म्हणाला.

“दमावयास काय झालें ?” स्वामींनी विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel