रघुनाथचे जाण्याचे दिवस जवळ येत चालले. एके दिवशी स्वामी व नामदेव अकस्मात देवापूरला आले,. भिका व जानकू यांना आनंद झाला. स्वामी व नामदेव आश्रमात उतरले होते.
“तुम्ही आमच्या घरी का नाही उतरला,” वेणूने विचारले.
“आश्रम हे मुख्य घर. आता मी आश्रमातच उतरले पाहिजे. आश्रम सर्वांचा,” स्वामी म्हणाले.
“रघुनाथ भाऊ येईल तर तो ही आश्रमात उतरेल?” वेणूने विचारले.
“नाही आश्रमाला वाहून घेईपर्यंत नाही,” स्वामी म्हणाले.
“तुम्ही आश्रमाला वाहून घेतले आहे?” वेणूने विचारले.
“पण मी आश्रमाकडे आलो असल्यामुळे मी आश्रमाचा पाहुणा आहे,” स्वामी म्हणाले.
“भिका वा जानकू भाक-या भाजता भाजता दमतील,” वेणू म्हणाली.
“मग तू ये मदत करायला. तूही आश्रमांतच जेव. रघुनाथ जेवेल,” स्वामी म्हणाले.
“चालेल! भिका, मी भाजीन रे भाक-या,” वेणू म्हणाली.
“बरेच झाले. रोज भाजून मिळाल्या तरी चालेल,” भिका म्हणाला.
“रोज नाही हो! आज पाहुणे आले आहेत म्हणून,” वेणू म्हणाली.
“रघुनाथ, जरा नदीवर नाही तर त्या मशिदीत जाऊ चल. थोडे बोलायचे आहे मला ,” स्वामी म्हणाले.
“नामदेव, रघुनाथ, स्वामी फिरायला गेले.
“रघुनाथ ! मेळ्याचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत. आश्रमासाठी पाचशे ठेवावे. उरलेले प्रचारकामात खर्च करावे. तुझ्या ओळखीचे आहेत का प्रचारक? चार प्रचारक वर्षभर ठेवता येतील. पुढील वर्षी पुन्हा मेळा काढू,” स्वामी म्हणाले.
“तुम्हाला प्रचारक कशा प्रकारचे हवेत,” रघुनाथने विचारले.
“राष्ट्राला चैतन्य देणारे, निर्भयता शिकवणारे, संघटनेचा मंत्र देणारे, क्षुद्र रुढी, व जानवी, शेंडी, गंध, मुकटे यांच्या धर्माऐवजी प्रेम, ऐक्य, स्वावलंबन, त्याग, उद्योग यांचे रणशिंग फुंकणारे, गरिबांच्या विपत्तिने जळणारे असे प्रचारक हवेत. चांगले अभ्यास केलेले व चारित्र्यवान असावेत खेड्यातील लोक चारित्र्य आधी पाहातात,” स्वामी म्हणाले.
“साम्यवाद, शेतकरी कामकरी संघटना करणारे, भांडवलशाहीला शिव्या देणारे, नवीन विचार देणारे असे प्रचारक चालतील?” रघुनाथने विचारले.