उन्हाळ्याची सुटी जवळ येत होती. नामदेव व रघुनाथ लौकरच परीक्षा संपून येणार होते. स्वामींच्या मनात एक नवीन कल्पना आली. छात्रालयांतील किंवा शाळेतील मुलांना सुटीमध्ये खेड्यांतील रस्ते करण्यासाठी बोलवावयाचें! देवपूर व मारवड जो रस्ता होता, तो पावसाळ्यांत ढोपर-ढोपर चिखलाचा होत असे. पावसाळ्यांत हा रस्ता जवळजवळ बंदच होई. बैल गा-यांत फसत. फार फजिती उडे. हा मैल दीडमैलाचा रस्ता आपण उन्हाळ्याच्या सुटीत तयार करावा असे स्वामींच्या मनांत आले. या वर्षी मेळा नको. हाच या वर्षीचा मुख्य कार्यक्रम. स्वामी मनांत योजना करू लागले. दैनिकांत त्यासंबंधी ते लिहू लागले. चीनमधील सारे रस्ते चिनी तरुण विद्यार्थ्य़ांनी कसे तयार केल, त्याची माहिती ते देऊ लागले. मुलांनी सुटीत घरी न जाता अशा प्रकारे खेड्यातील जनतेशी प्रेमाचा व सेवेचा संबंध जाडावा. दिवसा काम करावे, रात्री प्रवचने, कीर्तने, संवाद, पोवाडे, नकला, सदीप व्याख्यानें यांचा कार्यक्रम ठेवावा. दिवसां शरिराचा आनंद रात्री मनाचा आनंद! देवपूरला नदीहि आहे. पाण्यांत डुंबावे, पोहावे, मौजच मौज!
स्वामींनी त्या भावी मनोरथाचें मनोहारी चित्र दैनिकात काढले. मुलांमधून चर्चा, वाच्यता होऊ लागली. काही शिक्षकहि म्हणूं लागले की आपणहि जाऊ.
नामदेव व रघुनाथ आले. स्वामींना भेटले.
“रघूनाथ! देवपूरला तुम्ही जा व आश्रमांतच रहा. गांवांतील लोक गाड्या वगैरे देतील का त्याची चौकशी करा. आपणांस दगड आणावे लागतील. धाड गांवाहून दगड आणावे लागतील. तेथील टेकडीवरून दगड भरून गाड्या आणाव्या लागतील. किती गाड्या मिळतील? आजूबाजूच्या प्रदेशात दगड जवळपास कोठे आहेत? सारी चौकशी करा. लोकांत खूप उत्साह उत्पन्न करा. जवळजवळ शंभर स्वयंसेवक मिळतील असे दिसते. आपणांस झोपड्या उभाराव्या लागतील की काय? मशीद मोठी आहेच. मशिदीत तळ द्यावा. देवाचे मजूर मशिदीतच शोभतील! थंडगार मशीद आहे. कांही झाडाखाली पाल वगैरे द्यावे. पाहा. गांवांतील लोकांशी चर्चा करा. माझ्या मनांत किती आनंद उत्पन्न होत आहे सांगू?” स्वामी म्हणाले,
“नामदेव शेवटी शेवटी घरी जाणार आहे. तोहि आश्रमांतच राहणार आहे. रस्ता वगैरे झाला म्हणजे तो वडिलांना भेटायला जाईल,” रघुनाथ म्हणाला.
“आधी काम, मग घरची मंडळी. नामदेव! खूप काम करायचे बरे का? गांवांतील लोकांना मोहून टाक. गांवांत संगीत ने, चैतन्य ने, प्रकाश ने. प्रभात फेरीत तुम्हीहि सामील व्हा. वेणूबरोबर तुम्हीहि गा, तुम्हहि झेंडे घ्या, लाजू नका. झेंडा खांद्यावर घ्यावयास लाजेल त्याने जगावे कशाला? या भारतमातेचे जो जो अन्न खातो, येथले जो पाणी पितो, येथली हवा घेतो, त्या सर्वांचे भारतमातेचा झेंडा उंच राखणे हे पहिले कर्तव्य आहे. तुम्हा सुशिक्षितांना नाहीतर लाज वाटू लागते. देशाची गीते म्हणावयाची लाज, देशभक्तांचा जयजयकार करण्याची लाज, झेंडा हातांत घेण्याची लाज! ही लाज फेकून दिली पाहिजे. गाणे न म्हणण्याची लाज वाटो, झेंडा हातात न घेणार्यामाणसाची किळस येवो. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘मेली लाज धीट केली देवा.’ लाज मेल्याशिवाय धैर्य नाही. धैर्याशिवाय कार्याची प्रगती नाही. समजले ना? गांव सारा चैतन्यमय, राममय करा.” स्वामीजी जळजळित संदेश देत होते व ते दोघे जयविजय तो संदेश हृदयात साठवीत होते.