ओल्डेनब आणि कर्न ह्यांच्यासारखे पाश्चिमात्य विद्वान् पहिल्या संगीतीच्या ऐतिहासिकतेबद्दल साशंक आहेत. परंतु संगीती भरलीच नसावी असें म्हणणें उचित दिसत नाहीं. उलट पक्षीं, आपल्या धर्मसंस्थापकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अनुयायी लोकांनीं एकत्र जमून त्याच्या उपदेशाला मूर्त स्वरूप देण्याचें ठरवावें यांत अशक्य असें काहींच नाहीं. उलट, आपल्या गुरूच्या तत्त्वांबद्दल बेफिकिरी दाखविणें हेंच असंभाव्य वाटतें. पहिल्या किंवा दुसर्‍या संगीतींत तिपिटकाचीं सगळी पुस्तकें गायिली गेलीं असतील, हें मात्र संभवनीय वाटत नाहीं. कारण त्या वेळेपर्यंत तिपिटक हा सबंध ग्रंथसंग्रह पूर्ण झालेला होता असें वाटत नाहीं.

तिपिटकाचा संभाव्य काल : सम्राट् अशोकाच्या भाबरा येथील शिलालेखांत पालि वाङ्मयांतील (१) विनयसमुकसे, (२) अलियवसानि, (३) अनागतभयानि, (४)मुनिगाथा, (५) मोनेयसूते, (६) उपतिसपसिने, आणि (७) लाघुलोवादे१ (१. भाषांतरकाराची प्रस्तावना पहा. पान ७) ह्या धर्मपर्यायांच्या नांवांवरून, इ. स. पूर्वींच्या तिसर्‍या२ (Epigraphia Indica II 93; ZDMG. XL, p. 58; Rhys. David’s Buddhist India, pp. 167-68.) शतकांतील इतर शिलालेखांत धम्मकथिक, पेटकी , सुत्तन्तिक, सुत्तन्तिकिनी व पञ्चनेकायिक, इत्यादि शब्दांवरून असें सिद्ध होतें कीं बौद्ध वाङ्मय व त्यांतील विभाग, उदा. पिटक, सुत्तन्त, निकाय—हे लोकांना परिचित होते व त्या वेळेस निकायांची संख्याही पांचपर्यंत होती. तिसर्‍या संगीतीनंतर पालि वाङ्मय अशोकाचा मुलगा-महिन्द (महेन्द्र) यानें सिंहल द्वीपांत नेलें अशी आख्यायिका आहे. ह्यानंतरच्या काळांत पालि तिपिटकांत ढवळाढवळ झालेली दिसत नाहीं. कदाचित् धार्मिक ग्रंथांत ढवळाढवळ करणें हा त्याचा अपमान होय असें मानलें जात असेल. ह्या वेळेपूर्वींच हा ग्रंथसंग्रह पूर्ण झाला असावा कारण बौद्ध धर्माचा मोठा आश्रयदाता सम्राट् अशोक ह्याचें नांवही तिपिटकांत आढळून येत नाहीं.

अशा रीतीनें तिपिटकाचा अखेरच्या मर्यादेचा संभाव्य काल ठरविला जातो तो इ. स. पूर्व तिसर्‍या शतकाचा पूर्वार्ध. हाच काल सम्राट् अशोकाच्या कारकीर्दीचा होय.

दक्षिण आशिया खंडांतील सांप्रदायाप्रमाणें, ४५ वर्षें नवीन धर्माचा उपदेश करून बुद्ध इ. स. पूर्वीं ५४३ त मरण पावला. “बर्‍याच वर्षांपर्यंत पाश्चिमात्य विद्वान् गौतमबुद्धाच्या निर्वाणाचा काल इ. स. पूर्वीं ४८३ किंवा ४८७ असें मानीत होते,” असें चार्लस् ईलियट म्हणतो, “परंतु, शैशुनाग राजघराण्याच्या इतिहासावरील नूतन संशोधनावरून असें दिसून येतें कीं, बुद्धाच्या निर्वाणाचा काल इ. स. पूर्वीं ५५४ असावा.१” [१. Hinduism and Buddhism, vol. I, Introd. P. xix; Vinoent Smith’s Oxford History of India, p. 52 इ. स. पूर्व ४८३ हा काल इतर युरोपीय विद्वानांच्या मतेंही अद्याप निर्णायक असा मानला जात नाहीं. “Still…provisional” (Cambridge History of India, vol. i. p 171)] हें साल दक्षिण आशियांतील सांप्रदायिक मताला जवळ आहे. यावरून असें दिसून येतें कीं, जर आपण बुद्धाच्या निर्वाणाचा काल इ. स. पूर्वी ५४३ हा ठोकळ मानानें बरोबर आहे असें धरलें तर बुद्धानें धर्मोपदेशकाचें कार्य ६ व्या शतकाच्या पूर्वार्धांत केलें असलें पाहिजे. वरील विवेचनावरून असा निष्कर्ष निघतो कीं, तिपिटकाचा संभाव्य काल इ. स. पूर्वी ६ व्या शतकापासून ते ४ थ्या शतकापर्यंत असावा. एवढा मोठा ग्रंथसंग्रह पुरा होण्यास ३०० वर्षांचा काल म्हणजे कांहीं फार नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel