'प्रकाश आलाच कीं अंधार आलाच बरोबर. मला प्रकाशहि नको व अंधारहि नको.' कार्तिक म्हणाला.
'जेथें प्रकाशहि नाही व अंधारहि नाही असें काय ?' वत्सलेनें विचारलें.
'परब्रह्म. सर्व द्वंद्वांच्या तें अतीत आहे.' तो म्हणाला.
'निर्द्वद्व ! मला वीट आला त्याचा. ह्या नाचण्यांतील ब्रह्मात आनंद आहे. कधीं चाखला आहेस हा आनंद तूं, कार्तिक ?' तिनें विचारिलें.
'विष प्रत्येकानें चाखण्याची जरुरी नाहीं.' तो म्हणाला.
'परंतु एखादे वेळी माहित नसल्यामुळें गोड फळांनाहि कवंडळ समजून कोणी फेंकून द्यायचा. एखादा विद्वान् त्या फळाला मुकेल व एखादा रानटी तें चाखील.' वत्सला म्हणाली.
'तूं नाचतेस का माझ्याबरोबर ? आतां मुलीं नाहींत पाहायला. मुलां-मुलींदेखत नाचायला मला लाज वाटत होती. ये, धर माझा हात. आपण नाचूं.' कार्तिक पुढे होऊन म्हणाला.
'आतां नको, आजीनें लौकर यायला सांगितले होतें. काळोख पडूं लागला. चला जाऊं.' वत्सला म्हणाली.
'तुझा मी हात धरतों. नाहीं तर पडशील.' तो म्हणाला.
'नाचणा-यांची पावलें फारशीं चुकत नाहींत. त्याला नीट पावलें टाकायची संवय असते. परंतु धरायचाच असेल तर त्यांचा धर. ते या प्रदेशात नवीन आहेत. आपल्या गांवांत कधीं आलेले नाहींत. धर त्यांचा हात.' वत्सला म्हणाली.
'मी या गांवाला परका नाहीं. सर्व जगांत या गांवाइतका परिचित मला दुसरा गाव नाहीं. या नदीइतकी परिचित दुसरी नदी नाहीं. या टेकडीइतकी परिचित दुसरी टेकडी नाहीं.' तो तरुण म्हणाला.
'या मुलीइतकी दुसरी परिचित मुलगी नाहीं.' कार्तिक हंसून म्हणाला.
'हो, खरें आहे तें. माझी कोठें ओळखच नाहीं. मी एक ठिकाणीं घटकाभरहि राहत नाहीं. या गांवांतच आज दिवसभर राहिलों. माझ्या जीवनात अमर होणारें गांव.' तो तरुण म्हणाला.