'येथें.' ती नागानंदाच्या छातीवर हात ठेवून म्हणाली. नागानंदाच्या छातींतून रक्त येत होतें. पंजा तेथें लागला होता. त्याची तंगडीहि रक्तबंबाळ झाली होती. वत्सलेनें पदर फाडला व नागानंदाच्या पायावर तिनें पट्टी बांधिली. छातीवर हात धरून ठेवला.
'असा हात किती वेळ धरणार ? थांब, येथें मी पाला बघतों. रक्त थांबवणारा पाला. तो त्यावर बांधतों.' तो म्हणाला.
त्यानें ती वनस्पती शोधली. चांदण्यांत त्याला सांपडली. पाला काढून तो चोळून छातीवर बांधण्यांत आला. रक्त जरा थांबलें.
'वत्सले, तुला नाहीं ना लागलें ? ' त्यानें पुन्हां विचारिलें.
'नाहीं, तेवढें माझें भाग्य नाहीं. तुम्हाला मदत करतांना आज वाघानें मला मारावें, असें मनांत येत होतें. तुमचे प्राण वांचवण्यांत मला मरण मिळालें असतें तर मी कृतार्थ झालें असतें.' ती म्हणाली.
'मग वाघिणीच्या पुढें कां नाहीं उभी राहिलीस ? तूं तिच्यावर वार कां केलास ? तुलाहि जगायची इच्छा आहे. नाहीं म्हणूं नकोस. सांग, जगायची इच्छा आहे कीं नाहीं ?' त्यानें विचारले.
'जर तुम्ही जवळ असाल तर !' ती म्हणाली.
'वत्सले, तूं आपले प्राण कां संकटांत घातलेस ?' त्यानें विचारलें.
'तुम्ही मागें माझ्यासाठीं कां घातले होतेत ?' तिनें विचारलें.
'तूं उपकार फेडायला आली होतीस. होय ना ? शेवटीं मी परकाच आहें. माझें देणें देण्यासाठी आलीस. मीं माझे प्राण तुझ्यासाठीं पाण्यांत फेंकलें. तें ऋण परत करण्यासाठी आलीस ! देणेंघेणें हेंच ना तुझें माझें नातें ? अरेरे ! ' तो खिन्नतेनें म्हणाला.
'नागानंद, खिन्न होऊं नका. मी प्रत्युपकारासाठीं नाहीं आलें बरें. माझ्यावर विश्वास ठेवा. मी प्रेमामुळें आहें. तुमचें शरीर आतां तुमचें नाहीं. तें माझें आहे. तें माझें नसतें तर त्या दिवशीं तें वांचलें नसतें. हें माझें शरीरच तर वांचवण्यासाठीं मी आलें नागानंद, आपण दोघें कां वांचलों ? खरोखर कां वांचलों ? कां त्या प्रक्षुब्ध प्रवाहांत आपलीं जीवनें एकत्र आलीं ? पुन्हां दूर होण्यासाठीं एकत्र आलों ? नाहीं. नाहीं. आपण एकमेकांची आहोत. तुम्ही माझे व मी तुमची. आपली कोणीहि ताटातूट करूं शकणार नाहीं. वाघ येवों कीं मृत्यु येवो.' असें म्हणून तिनें नागानंदाच्या गळयाला मिठी मारली. त्यानें तिला हृदयाशी धरून ठेवलें.