वाघानें एक गाय मारून रानांत टाकली होती. तेथें रात्रीं वाघ येईल अशी नागानंदाला खात्री वाटत होती. त्यानें वाघाला मारण्याचें निश्चित केलें. तिसरे प्रहरी वत्सला शेतावर आली. नागानंद भाल्याचें पातें घाशीत होता. त्याला धार लावीत होता.

'तुम्ही का एकटे जाणार वाघाच्या शिकारीला ?' तिनें विचारिलें.

'हों.' त्यानें उत्तर दिलें.

'मी येऊं बरोबर ?' तिनें विचारिलें.

'नको' तो म्हणाला.

'कां ? ' तिनें कंपित स्वरांत विचारिलें.

'दुस-याच्या मदतीनें, एका स्त्रीच्या सहाय्यानें, मी वाघ मारला अशी माझीं निंदा करतील. माझ्या यशाला कलंक नको. नागानंदाच्या नांवाला काळिमा लागावा असें तुला वाटते ? ' त्याने प्रश्न केला.

'मी का दुसरीं, मी का परकी ? ' तिनें डोळयांत पाणी आणून विचारिलें.

'परंतु तूं माझ्या हृदयांत आहेस, माझ्या जीवनांत आहेस, म्हणूनच येऊं नकोस् तुझी शक्ति माझ्या हातांत येऊन बसेल. आपण निराळीं नाहीं, म्हणूनच येण्याची जरूर नाही.' तो म्हणाला.

'बरेंवाईट झालें तर ?' तिनें विचारिलें.

'तूं माझी आठवण नाहीं ठेवणार ?' तो म्हणाला.

ती अधिक कांहीं बोलली नाहीं. ती निघाली. तो तिला थोडें पोंचवायला गेला.

'जा तुम्ही माघारे. अंधार होईल तुम्हाला परत जायला. ती म्हणाली.

'मला सदैव अमावास्याच आहे.' तो म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel