जटाजूट म्हणजे हिमालयावरील प्रचंड बनें. आकाशाला भेटणारी भूर्ज व देवदारांची बनें. हजारों वृक्षवनस्पति, लतावेली, हा शंकराचा जटाजूट. हें सारें काव्य आहे. आपले पूर्वज फार कविहृदयाचे होते. दाट धुकें पसरलें म्हणजे हा हिमालय भस्माच्छादित मुनीप्रमाणेंच दिसेल ! हिमालयासारखा कोण योगी ? कैलासराण्याहून कोण महान् तपस्वी ?  त्याला शशिखंडशिंखंडमंडन चंद्रशेखर -- नाना नांवे दिलीं.  अनेक पशूंना तो आधार देतो म्हणून पशुपति म्हटलें. ह्या हिमालयावर कोणी योगी ध्यान करीत आहे अशी मूळ कल्पना.  त्याला मग धूर्जटी वगैरे अनंत नांवे दिली.  हिमालयांतून वाहणा-या नद्या जगताचें आईप्रमाणें पोषण करणा-या नद्या, त्या सर्वांना हा योगराणा जवळ घेतों त्यांचा जणू तो पति, सांभाळकर्ता. म्हणून सांब, गिरिजापति, गिरिजारमण अशीहिं त्याला नांवें आहेत. सृष्टींत जें जें उदात्त, सुंदर, कल्याणमय आहे त्याला त्याला पूर्वज परमेश्वर मानीत.' आस्तिक म्हणाले.

इतक्यांत आवाज कानांवर आले. गाणीं कानांवर आलीं.  यात्रेंहून मुलें परत आली. धांवत आलीं ती गंगेच्या तीरावर. भगवान् आस्तिकांना भेटायला ती इकडेच आलीं.

'आले, सारे आले.' शशांकानें टाळी पिटली.

'इकडेच आले ते.' रत्नकांत म्हणाला.

सर्वांनी येऊन वंदन केलें. आस्तिकांच्या भोंवती सारे बसलें.

'कशी काय झाली यात्रा ? मौज होती ना ? ' आस्तिकांनी विचारिलें.

'यंदाची यात्रा आम्ही कधीं विसरणार नाहीं.  अमर यात्रा, खरोखरची यात्रा. ' नागेश म्हणाला.

'काय होतें यंदा तेथे ? ' आस्तिकांनी प्रश्न केला.

'हा शुध्दमति सर्व सांगेल.' बोधायन म्हणाला.

'गुरुदेव, तुम्ही तेथें हवे होतात. तुमचा संदेश सर्वत्र जात आहे. प्रेमाचा संदेश. प्रतिवर्षाप्रमाणे यात्रा भरली.  हजारों आर्य व नाग जमले होतें. स्त्रिया, पुरुष, मुलेंबाळें--सर्वांचे थवेच्या थवे लोटले होते. कोणी पायीं आलें होतें, कोणी रथांतून, कोणी रंगीत गाडयांतून, कोणी घोडयावरून आले, कोणी पालखींतून आले. खेळ चालले होते. गाणीं चाललीं होती. इतक्यांत नागजातीचें कांहीं तरुण हातांत लहान लहान लांकडी गदा असलेले असे आले. त्यांच्याभोवतीं गर्दी झाली.  त्यांच्यातील एकजण सांगू लागला, 'नाग तेवढे एक व्हा. हा नागांचा देश आहे. आपल्या सुपीक जमिनी आर्य घेत आहेत, आणि पुन्हां आपणांलाच दस्यु म्हणत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel