'तो आश्रम आज नाहीं. त्या आश्रमांत आर्य-अनार्य उभय तरुण होतें. एके दिवशी आर्यांनी त्या आश्रमावर हल्ला केला. आश्रमाचे आचार्य समीप आले व म्हणाले, 'हत्या करूं नका. उद्यापासून हा आश्रम बंद होईल. हा आश्रम बंद झाला तरी सत्य आपोआप प्रसृत होईल सत्य सत्य आश्रमावरच जगत नाहीं. सत्य सहस्त्र मार्गांनी वाढत असतें. सत्याच्या प्रसाराचे नियम अतर्क्य आहेत. सत्याच्या जगण्याची मला चिंता नको. आश्रम बंद समजा.' आम्हांला निरोप दिला. त्या वेळीं आम्हांला मरणप्राय दु:ख झालें. परंतु तें म्हणाले, 'आतां तुम्हीच एकेक आश्रम बना. जेथें जाल तेथें आश्रमीय ध्येयांची निर्भयपणें परंतु नम्रपणें, प्रेमळपणें परंतु नि:स्पृहपणें, जोपासना करा. आपण दूर गेलों तरी जवळच आहोंत. एका ध्येयानें बांधलेले कोठेंहि गेले तरी एकत्र आहेत. ज्ञानमय नात्याला, चिन्मय नात्याला दिक्कालांचा प्रतिबंध होत नसतो.' आमचे आचार्य कोठें गेले तें कळत नाही. कोणी म्हणतात कीं, 'त्यांचा अवतार संपला.' माझे तर ते मायबाप होते. त्यांनी मला ज्ञान दिलें, प्रेम दिलें. सर्वत्र छात्रांवर त्यांचा लोभ. परंतु माझ्यावर अधिक; कारण मी पोरका होतों. मी या अफाट जगांत एकटा होतों. एखादें गोड बोर मिळालें तरी तें ते माझ्यासाठीं ठेवीत. किती किती त्यांच्या आठवणी ! एके दिवशीं आम्ही रानांत मोळया आणण्यासाठी गेलों होतों. आमच्यांतील एक नागकुमार जरा अशक्त होता; परंतु इतरांनी त्यालाहि मोठी मोळी उचलायला लावलें. तो दमला, हळू चालूं लागला. मीहि हळू चालूं लागलों. इतर मुलें पुढें गेली. मी माझी मोळी खालीं टाकली. त्या मुलालाहि 'मोळी खाली टाक' म्हणून मी सांगितलें. त्याच्या मोळींतील लांकडें मी माझ्या मोळीत घातली. त्याची मोळी हलकी केली. तो नको म्हणत होता. 'ती मुले चिडवतील, नांवे ठेवतील' असें म्हणत होता. मी म्हटले, 'बघूं कोण चिडवतो तो. भिऊ नको.' लहान हलकी मोळी त्याच्या डोक्यावर मी दिली. मोठी मोळी मोठया कष्टाने मी माझ्या डोक्यावर चढविली; आम्ही नाग मोळीतील एक लांकूड जरा लांब ठेवतों. त्यांच्यावर मोळी टेंकून उभी करतों व मग डोक्यावर घेतों. म्हणजे जड मोळीहि दुसरा कोणी नसला जवळ तरीं डोक्यावर घेतां येते. आश्रमांत आचार्य वाट पाहत होते. त्यांच्याच्यानें राहवेना. ते आम्हांला पाहण्यासाठी निघाले. तोच 'आले, आले' करून मुलांनी टाळया पिटल्या. माझी भक्कम मोळी पाहून आचार्य म्हणाले, 'एवढी जड का मोळी आणावी ?' मी कांही बोललों नाहीं. परंतु मागून त्यांना सारी वार्ता सांगितली. त्यांना वाईट वाटलें. दुसरे दिवशी प्रार्थनेच्या वेळी ते म्हणाले, 'मुलांनो, समानता, समानता' तुम्ही म्हणता. परंतु समानतेचा खरा अर्थ काय ? पुष्कळ शब्द आपण उच्चारतों. परंतु त्या शब्दाचा नीट अर्थ न पाहूं तर पस्तावूं. वेदांचा अभ्यास करतांना स्वर चुकला तरी अर्थांत केवढा घोटाळा होतों तें तुम्ही पाहिलेंच आहे. समानता, स्वतंत्रता हे शब्द तुम्हां तरुणांत वारंवार उच्चारले जात असतात. समानता म्हणजे सर्वांना समदृष्टीने पाहणें, समदृष्टीनें वागविणे. परंतु याचा अर्थ काय ? याचा अर्थ का हा कीं लहान मुलांलाहि मोठया माणसाइतकें काम करायला लावणें ? ती समानता त्या मुलाला मारक होईल. तसेंच माझ्यासारख्या वृध्दालाहि तरुणाइतकें काम करायला लावाल तर ती का समानता होईल ? समानता म्हणजे ज्याच्या विकासाला जें पाहिजें तें देणें. कोणाच्याहि विकासाला अडचण येऊं नये. आपल्या आश्रमांत एखादा अशक्त मुलगा असला तर त्याला थोडा निराळा आहार दिला पाहिजे. त्याला जर थोडें दूध अधिक दिलें तर का समानता नष्ट झाली ? काय, तुम्ही त्या अशक्त पद्मनाभला जड मोळी आणायला भाग पाडलें ? त्याच्यानें चालवेना. तो थकला. जर नागानंदानें थांबून मनाचा मोठेपणा दाखविला नसता, त्या पद्मनाथविषयीं कळकळ दाखविली नसती, ता तो वाटेंत पडता, सूर्याच्या प्रखर तापानें मरता. पुन्हां असें करूं नका. ज्याला झेपेल तेवढें त्याला द्यावें. नागानंद भर पुरांत उडी मारतो, म्हणून सर्वांना का मरायला सांगूं ? अलबत् सर्वांनी तशी शक्ति यावीं म्हणून खटपट केली पाहिजे. दुबळेपणाची पूजा नाहींच कधीं करतां कामा. काम फार पडूं नये. सर्वांनी आपली कींव करावी, आपणांस सुकुमार म्हणावें, असल्या गोष्टींचा त्याग निश्चयें करून केलाच पाहिजे. परंतु तारतम्यभाव ओळखला पाहिजे. या हाताचीं बोटें सारखीं नाहींत.