त्या दिवशीं वत्सला मैत्रिणींबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरीं एकटीच बसली होती. थोडया वेळानें नागानंद आला. दोघें बोलत बसलीं.
'नागानंद, तुम्ही रानांत राहतां, हातांनी स्वयंपाक करतां. तुम्ह येथेंच कां नाही जेवायला येत ? तुम्ही जेवायला आलांत तर तीहि पोटभर जेवील. वत्सला हंसते, आनंदी दिसते. परंतु कसली तरी चिंता तिला आहे. कीड कळीला आंतून खात आहे. तुम्ही कां नाहीं करीत दया ?' सुश्रुतेनें विचारलें.
'मी का येथें येऊन राहूं, येथें जेवायला येऊं ? नको आजी, नको. मला मिंधेपणा नको. स्वावलंबन बरें. तुमची सहानुभूति आहे तेवढी पुरे. मला ना आई, ना बाप. मी तुमच्याकडे एखाद वेळीं असा कां येतों, माहीत आहे ? आईची होणारी आठवण विसरण्यासाठीं. कोणाशीं मनांतलें सांगांवें, बोलावें ?' तो म्हणाला.
'नागानंद, तुमचे वडील काय करीत, कोठें राहात ?' तिनें प्रश्न केला.
'मला माहीत नाहीं. माझे वडील मींपाहिले नाहींत. पाहिले असले तरी आठवत नाहीं. कोणा तरी आर्यानें माझ्या आईची फसवणूक केली होती. त्याचें नांव तिनें आम्हांला सांगितलें नाहीं. ती म्हणे, 'त्याचें नांव जगाला सांगेन तर जग तें अनादरील. तें माझ्या मनांतर राहूं दे.' माझी आई त्याची मानसपूजा करी. जेवायला बसली तर शेजारीं एक पान मांडी. त्या पानाचा नैवेद्य दाखली. मी आईला विचारीं, 'हें कोणाचें पान ?' ती म्हणे, 'तुझ्या पित्याचें, तुझ्या जन्मदात्याचें.' शेवटीं ती त्या पानांतील एक घास खाई व मग उठें. एखादे वेळेस आई डोळे मिटून बसे. मी म्हणें, 'आई, डोळे मिटून कोणाला बघतेस ?' ती म्हणे, 'माझ्या हृदयांतील देवाला, तुझ्या जन्मदात्याला.' अशी माझी आई होती. अशी ती सती होती. तुच्छ मानल्या जाणा-या नागांत अशा देवता जन्मतात. अहंकारी आर्यांना तें दिसत नाहीं. माझी आई ! ती पावित्र्याची प्रेमाची मूर्ति होती.' नागानंद म्हणाला.
'तुम्हांला भावंडें नाहींत ?' तिनें विचारिलें.
'आम्हीं जुळीं होतों. बहीण व भाऊ. माझी बहीण गोरी गोरीपान होती. मी काळासांवळा. परंतु माझ्या बहिणीचीहि मला आठवण नाहीं. ती देवाकडे लहानपणीं गेली. नागलोकीं गेली. परंतु आई सांगत असें सारें. ती मला म्हणायची, 'तुझा रंग माझ्यासारखा आहे. परंतु तिचा त्यांच्यासारखा होता.' आम्ही दोनतीन वर्षाचीं झालों होतों. एके दिवशीं आम्हां दोघांना निजवून आई कामाला गेली होती. तों इकडे आग लागली. आमची वसाहत भस्म झाली. आर्यांनीच लाविली ती आग. गांवची मंडही शेतांत होती, ती धांवत आली. माझी आई धाय मोकलून रडूं लागली. आमचें घर पेटलें होतें. आम्हीं आंत जळून मरणार या कल्पनेनेंच ती मूच्छित झाली. परंतु एका उदा आर्यानें आगींत शिरून आम्हांला वांचविलें. तोहि बराच भाजला. परंतु तो घरीं गेला. त्याचें पुढें कांहीं कळलें नाहीं. आई आम्हां दोघां लेंकरांना घेऊन दुसरीकडे गेली. पुढें धाकटी बहीण मेली. मग आईला माझाच आधार. परंतु एका मातेचा निरोप घेऊन जात असतां वीज अंगावर पडून ती मला सोडून गेली. ती कहाणी मी मागें सांगितली होती. ' नागानंद म्हणाला.