परंतु त्याच्या मनांत तो अपमान सलत होता. कोणीं केली ती विटंबना ? याचा त्याने शोध चालविला. 'राजा परीक्षितीनेंच ही गोष्ट स्वत:च्या हातानें केली,' असे एका राजसेवकाकडून त्याला कळलें. प्रजेमध्येंहि ही गोष्ट प्रसृत झाली. वक्रतुंडानें तिचा फायदा घेतला. 'राजाला नागपूजा मान्य नाहीं, नागजातीची संस्कृति मान्य नाहीं.' असा प्रचार त्यानें व त्याच्या हस्ताकांनी सुरू केला. ठिकठिकाणीं मारलेले सर्प नागांच्या पाषाणमयी मूर्तीवर फेंकण्यांत येऊं लागले. यासाठींच साप हुडकून मारायचें कीं नागजातीला चिडवितां यांवे. साप मारावा व नागांच्या अंगावर टाकावा. साप मारावा, त्यांच्या दारांत आणून टाकावा. असे प्रकार सुरू झाले. राजाचा आपणांस पाठिंबा आहे, असें कळतांच दबलेला द्वेष बाहेर पडूं लागला.
नागजातींच्या तरुणांतहि प्रचंड हालचाली सुरू झाल्या. आर्यांच्या गाई चोरणें, आर्यांवर हल्ले करणें या गोष्टींचा त्यांनी अवलंब केला. जीवन सुरक्षित राहिलें नाहीं.
एके दिवशीं कांही तक्षकवंशीय नागतरुणांची जंगलांत परिषद भरली होती. आर्यांवर कसा सूड घ्यायचा याची चर्चा होत होती. 'राजा परी-क्षितीचाच वध करावा.' असें कांहीं म्हणूं लागले. 'या राजाचाच हा चावटपणा आहे, या राजालाच हीं भांडणे पाहिजे आहेत,' असें एकानें बोलून दाखविलें. चर्चा जोरजोरानें होऊं लागली.
'आर्यांच्या विरुध्द सर्व नागांची संघटना केली पाहिजे. मणिपूर वगैरें जीं निर्भेळ नागराज्यें आहेत, तेथें जास्तच जोर केला पाहिजे.' मणिनाग म्हणाला.
'इंद्र वगैरे आर्य राजे आपणांस अनुकूल आहेत. त्यांच्याशीं अधिक स्नेहसंबंध जोडले पाहिजेत. इंद्राच्या राज्यांत आर्य व नाग असले भेद नाहींत. तेथें नागजातीचे लोकहि मोठमोठया अधिकारांवर काम करीत आहेत.' तेजस्वी वासुकि म्हणाला.
'दोन नाग प्रधान आहेत. तेथें इंद्र त्यांना फार मान देतो.' अनंतानें सांगितलें.
'आपले जे महोत्स्व असतात, आपल्या ज्या यात्रा असतात त्यांतून प्रचार केला पाहिजे.' तक्षक त्वेषानें म्हणाला.
'परंतु प्रचार कोणता करावयाचा? कारण नागांच्या महोत्सवांस आर्यहि पुष्कळ येतात. कडेवर मुले घेऊन आर्यस्त्रियाहि येतात. आर्यांच्या महोत्सवांसहि नाग जातात. अडचण अशी आहे कीं, बहुजनसमाज एकमेकांशी चांगला वागत आहे. संबंध प्रेमाचे जडत आहेत. जडलेले दृढ होत आहेत. जपून प्रचार केला पाहिजे. नागांनी संबंटित व्हावें. परंतु मुद्दाम आर्यांचा त्यांनी द्वेष करूं नये. आर्य बाहेरून आले म्हणून त्यांना हांकलून द्यावें, असें म्हणूं नये. जर आर्य नागांवर अतिक्रमण करतील, नागांच्या धर्मभावना दुखवतील, तर प्रतिकार करावा. दोन्ही समाजांनी समाधानानें नांदावें अशी आमची इच्छा आहे असें सांगावें. द्वेषासाठीं द्वेष नको. जे चांगले आर्य आहेत, त्यांचे कौतुक आपण केलें पाहिजे. सर्व आर्यच वाईट असें नये म्हणता कामा.