राजा, विवेकाने बघ. निर्मळ प्रेमळ निरहंकारी दृष्टीनें बघ. शांतपणें हृदयांत डोकावूनबघ. माझें म्हणणें तुला पटेल. परंतु मला तूं वाचवावें म्हणून हें मी बोलत नाहीं. या नागांचा व त्यांना सहानुभूति दाखविणा-या सर्वांचा संहार करणार असशील तर माझीहि आहुतिं पडूं दे. नागजातींचा समूळ संहार चालला असतांना कोणाला जपतप करीत बसवेल, आश्रमांत राहवेल ? देवांच्या सहस्त्रावधि लेकरांचा अमानुष छळ होत असतांना कोण स्वस्थ बसेल ? इंद्रासारखें तुझ्याशी शस्त्रास्त्रांनी लढतील. तरवार हातीं घेऊन लढणें हे माझे काम नाहीं. माझ्यासारखा तपोधन तरवारीसमोर शांतपणे उभा राहील. अन्यायाला जीवनार्पणानें विरोध करील. पशुत्वाविरुध्द मनुष्यत्व उभे करून विरोध करील. राजा, या थोर माता तूं गाईप्रमाणे उभ्या केल्या आहेस. राजा, तुझ्या आयाबहिणींना, तुझ्या कुटुंबातील सर्वांना जर कोणीं असें दो-या बांधून उभे केलें असतें तर ? प्रत्येक गोष्ट स्वत:वरून पाहावीं. अरे, या तुझ्याच मायबहिणी आहेत. अर्जुनानें नागकन्यांशी नव्हते का विवाह केले ? आणि ती सती द्रौपदी ती तरी कोण होती ? मला तर वाटतें ती नागकन्याच असावी. कारण ऋषि अग्नीनें ती द्रुपद राजाला दिली. द्रुपदाला मूलबाळ नव्हतें. ऋषि अग्नि हा आर्यांच्या वसाहती वाढवणारा. त्यानें नागांना छळलें. परंतु सुंदर नागबाला पाहून त्यांचेंहि हृदय द्रवलें. ती लहान मुलगी त्यानें द्रुपदाला नेऊन दिली. ती काळीसांवळी होती म्हणून तिला कृष्णा असेंहि म्हणत. द्रुपदानें प्रेमानें तिला वाढवलें व ती द्रौपदी म्हणून ओळखली जाऊं लागली. माझे मत सर्वांना नाहीं पटणार. केवळ कृष्णवर्ण म्हणून आर्य नव्हत, असा सिध्दांत कसा मांडावा ? आम्हां नागांतहि कांहीं श्वेत नाग आहेत  तुमच्या आर्यातहि कांहीं कृष्णवर्ण आर्य असतील. परंतु खांडववन जाळवणा-या अग्नीनें द्रुपदाला ही मुलगी नेऊन दिली, ही गोष्ट निर्विवाद. तें कांहीं असों. मला सांगायचें एवढेंच कीं, या नागमाता एक प्रकारे तुझ्या माताच आहेत. त्यांचे बलिदान करायचें असेल तर कर. त्या मातांबरोबर माझेंहि भस्म होवों. माझ्या मातीचेंहि सोनें होवो.

राजा, या पृथ्वीवर शांतीचे राज्य असावें, अशी त्या पूर्वीच्या महर्षींची तळमळ. प्रत्येक वेदमंत्रांच्या शेवटीं ' ॐ शांति: शांति: शांति: ' अशी त्रिवार उत्कट ध्येयघोषणा त्यांनी केली आहे. पूर्वजांचीं थोर ध्येये उत्तरोत्तर अधिकाधिक मूर्त करावयाचीं हें पुढील पिढयांचे काम असतें. परंतु तूं तर त्या ध्येयांना मातींत मिळवूं पाहात आहेस. तूं ह्या नागांना नाहीं जाळायला उभें केलेंस, तर थोर पूर्वजांची महान् ध्येयें, त्यांची थोर स्वप्ने, त्यांच्या आशाआकांक्षा ह्या सर्वांची तूं होळी करणार आहेस. राजा, मनुष्यत्व कशांत आहे तें लक्षांत घे. पशुतेचा त्याग करीत दिव्यत्वाकडे जाणें हे मनुष्याचें काम. तूं कोठें रे खालीं चाललास ? अहंकाराच्या भरीस पडून कोठें चाललास वाहवत ? राजाची मति भ्रष्ट झाली तर सा-या राष्ट्राचा नाश होतो. भगवान शुक्राचार्यांच्या  सांगण्यांवरून तुझ्या पित्यानेच विष चारणा-या त्या तरुण  नागाला क्षमा नाहीं का केली, प्रेम नाहीं का दिले ? आज परीक्षिति काय म्हणत असतील ? मरतांना त्यांनी जें दिव्यत्व दाखविलें तें का तूं धुळींत मिळविणार ?

राजा, पुन्हा विचार कर. विवेकाला स्थान दे. आर्य व नाग यांचे ऐक्य करणारा म्हणून इतिहासांत विख्यात हो. तूं नागांचे हवन आरंभणारा म्हणून इतिहासांत राहशीलच. परंतु हें हवन थांबवून दोन्ही जातीचे मीलन करणाराहि तूंच होतास, असेंहि इतिहास सद्गदित होऊन सांगेल. आर्य व नाग यांची हृदयें जोड. या थोर सती, या थोर मायबहिणी, यांना आदरानें वस्त्रालंकार दे. सर्वांचा सत्कार कर. हे नागबंधु, यांनाहि भेटी दे. सर्वांना जवळ घे. प्रेम दे. शल्यें बुजव. इंद्र वगैरे इतर सर्व राजांनाहि बोलाव. सर्व भरतखंडातील राजे येऊं देत. सर्व भरतखंडभर आर्य व नाग यांच्या ऐक्याचा संदेश जाऊं दे. आतां आर्यांनी नागांच्या वाटेला जाऊं नये, नागांनी आर्यांच्या जाऊं नये; एवढेच नाहीं, दोन्ही समाज, दोन्ही वंश एकमेकांतमिळून जाऊं देत, एकरूप होऊ देत. भारताचें तोंड नवतेजानें फुलूं दे. भावी पिढयांना उत्तरोत्तर वाढत जाण्याचें, भेदांत अभेद पाहण्याचें ध्येय मिळूं दे. आज आर्य व नाग एक होत आहांत. उद्या तुमच्यांत आणखी प्रवाह येऊन मिळतील. या भरतभुमींत तो विश्वचालक मानवजातीचें सारे नमुनें आणील व एक मनोज्ञ असें दृश्य दाखवील. ही त्याची इच्छा ओळखून वागूं या. ईश्वरी इच्छेच्या विरूध्द जाण्यानें आपण मरूं. दुस-यास मारूं. प्रवाहाच्या विरुध्द दिशेनें पाहण्यांत अर्थ नाही. या भरतखंडाच्या इतिहासाची गति मानवैक्याकडे आहे. तिकडे हा प्रवाह चालला आहे. हा प्रवाह पुढें धीर-गंभीर होऊन, अति विशाल होऊन,सच्छांतीच्या सागराला मिळेल !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel