'गर्जना करणा-या मेघाला शेवटीं वीज जाळते व मेघ रडूं लागतों.' जनमेजय म्हणाला.
'या बावळटांसहि अग्नीच्या ज्वाला जाळतील. रडत-ओरडत मरतील.' वक्रतुंड म्हणाला.
'उद्यां सर्व राजबंदींना -- स्थानबध्द स्त्री-पुरुषांना--बाहेर काढावें. शृंखलांसह बाहेर काढावें. त्यांच्यादेखत नागानंद-वत्सला यांची पहिली संयुक्त आहुति द्यावी. दांपत्याची संयुक्त आहुति ! अशा संयुक्त आहुत्या किती देतां येतील ? किती आहेत असे जोड ? ' जनमेजयानें विचारलें.
'दोन हजारांवर आहेत. अजून येत आहेत.' वक्रतुंड म्हणाला.
प्रभात आली. आज लाल लाल सूर्य उगवला होता. तो कां संतप्त झाला होता ? संसाराचें स्मशान करणा-या मानवांचा का त्याला तिटकारा वाटत होता ? आपण या मानव जातींसाठीं रात्रंदिवस तापतों. परंतु ही मानवजात शेवटीं पै किंमतीची ठरली म्हणून का त्याला संताप आला होता ? आपणच द्वादश नेत्र उघडावें व भस्म करावें सारें जगत् असें का त्याला वाटत होतें ? नाहीं. देवाला असें वाटत नाहीं. तो आशेनें आहे. शेवटीं सारें गोड होईल, आंबट आंबा पिकेल ही अमर आशा त्याला आहे.
प्रचंड होमकुंडे धडधड पेटूं लागलीं. सर्वत्र सैन्याचें थवें ठायीं ठायीं सज्ज होते. कारागृहांतून स्त्री-पुरुष नागबंदी बाहेर काढण्यांत आले. त्यांना दोरीने बांधून उभे करण्यांत आलें. नागानंद व वत्सला यांनाहि आणण्यांत आलें. एका बाजूला त्यांना उभे करण्यांत आलें.
राजधानींतील स्त्री-पुरुषांचे थवे लोटलें. सर्वांचे डोळे भरून आले. हीं निरपराध माणसें का आगींत फेंकली जाणार ? यासाठीं का हीं होमकुंडे धडधडत आहेत ? अरेरे ! त्या ज्वाळा ध्येयाकडे जाणा-या जीवांच्या धडधडणा-या आत्म्यांप्रमाणे दिसत होत्या. मानवांत प्रेम नांदावें, बंधुभाव नांदावा यासाठी धडपडणा-या जीवांना भेटून पवित्र होण्यासाठीं त्या ज्वाळा तडफडत होत्या. ध्येयार्थी व्यक्तींना ध्येयाचा मार्ग विचारण्यासाठीं त्या ज्वाळा उसळत होत्या. त्या तेजस्वी सूर्यनारायणाच्या चरणांशी आम्हीं कां जावें हें त्या ज्वाळांना विचारावयाचें होतें. सूर्य त्यांचे ध्येय, तेजाच्या समुद्रात बुडण्यासाठीं त्या वर जाऊं पाहत होत्या. प्रेमसमुद्रांत, चित्सिंधूत डुंबणारा मानवच आपणांस मार्ग दाखवील असें त्या ज्वाळांस वाटत होतें. ज्वाळांनो, वर वर जाणा-या ज्वाळांनो, खालीं केलें तरी वर उफाळणा-या अदम्य ज्वाळांनो ! चालूं द्या तुमची धडपड. उत्तरोत्तर उच्चतर जाण्याची धडपड !
जनमेजय आला. वक्रतुंड आला. इतर मोठे मोठे राजपुरुष आले. तेथें एका सिंहासनावर महाराजाधिराज जनमेजय बसला. त्याच्या नांवाने ललकारी झाली. परंतु सर्व नागबंदींनीं 'प्रेमधर्माचा विजय असो ! ऐक्याचा विजय असो ! ' अशी गर्जना केली.