'खरंच. परंतु मी दोघांसारखा आहें. त्या दिवशीं आई मला म्हणे, 'त्यांच्यासारखें आहेत तुझे डोळे, त्यांच्यासारखें आहे नाक.' त्यांच्यासारखें म्हणजे तुमच्यासारखें ना हो, बाबा !' त्याने विचारिले.

'बरें, हें दूध पी. उशीर झाला. वाघबीघ यायचा. ' नागानंद म्हणाला.

'मग मी मारीन. मी मांजराला मारतों, पण तें मला चावत नाहीं. वाघालाहि मारीन थप्पड.' शशांक म्हणाला.

'आणि वाघ चावला तर ? ' आईने विचारिलें.

'चावला तर ?  मग त्याला सातआठ देईन थपडा. मी भिणार नाहीं. मी धीट आहें. मी पुढें जाऊं एकटा काळोखांतून ? ' तो म्हणाला.

'आपण सारींच जाऊं काळोखांतून बरोबर.' नागानंद म्हणाला.

'काळोखांतून प्रकाशाकडे.' वत्सला म्हणाली.

'घरचा दिवा दुरून दिसेल.' शशांक म्हणाला.

आस्तिक आश्रमांत होते. सर्व मुलें एका यात्रेला गेली होतीं. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असें. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदां तो खनित्रानें खणीत होता.  तेथें एका नागिणीचीं पिलें होतीं. त्यांच्यावर पडला घाव. खनित्राला त्या पिलांची आंतडीं लागून बाहेर आली !  तेथें रक्त सांचलें ! त्या शेतक-याला वाईट वाटलें. तो तेथें रडत बसला. तिकडून आली नागीण !  तो तेथें पिलें मेलेलीं !  ती सळसळूं लागली, वळवळूं लागली. समोर शेतकरी रडत होता.  नागीण त्याला म्हणाली, ' माझीं पिलें मेलीं म्हणून तुलाहि वाईट वाटत आहे,  मग मला किती वाईट वाटत असेल ? कोणीं मारलीं हीं पिलें ? हीं मेलेलीं पाहून का तूं रडत आहेस ? ' तो शेतकरी म्हणाला, 'आई, माझ्याच हातून हीं पिलें मारलीं गेलीं. खणीत होतों. खालीं पिलें असतील ही कल्पना नव्हती. घाव घातला तो खोल गेला. पिलांना लागला. माझे डोळे भरून आले. क्षमा कर आई.' नागीण म्हणाली, 'तूं पिलें मारून पळून गेला नाहींस. नागीण येऊन डसेल असें मनांत येण्याऐवजीं तूं रडत बसलास येथे. खरें आहे तुझें मन.  खरें आहे जीवन. असा मनुष्य मीं पाहिला नाहीं. जा हो तूं. मी तुला दंश करणार नाहीं. क्षमा करतें तुला.' प्रणाम करून तो गेला. परंतु दुस-या दिवशीं तेथें येऊन पाहतो तों नागीण तेथें मेलेली होती. तिनें का प्राण सोडले ? पिलांपाठोपाठ तींहि का गेली ? शेतक-यांना उचंबळून आहें. साधीं सरपटणारी जात. परंतु पिलांवर किती माया ! आणि पिलें मारणारालाहि क्षमा करणारें केवढें थोर मन ! त्यानें फुलें आणलीं. गंध आणलें. चंदनाची काष्ठें जमविली. त्या पिलांना व त्या आईला त्यानें अग्नि दिला. पुढें त्यानें पाषाणाची सुंदर मूर्ति करून घेतली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel