'तुला विवाहाची देणगी देण्यासाठीं. तुला कोणता रंग आवडतों ? पांढ-या वस्त्रांतच तूं सुंदर दिसतेस.' तो म्हणाला.
'परंतु त्यांना आवडतो हिरवा रंग.' ती म्हणाली.
'त्यांना आवडेल तेंच तेस. मी हिरव्या रंगाचें वस्त्र तुला देईन. तें नेसशील ? मला तेंवढेंच समाधान. मी तुझ्याजवळ नाहीं येऊं शकत, तुझ्या हृदयाजवळ नाहीं येऊं शकत. परंतु मी विणलेलें वस्त्र तरी येऊं दे. करशील एवढी दया ?' त्यानें विचारिलें.
'करीन. परंतु तूं बभ्रा नये करता कामा. गुपचुप सारें केलें पाहिजे. नाहीं तर गांवभर सांगत सुटशील.' ती म्हणाली.
'वत्सले, तुझ्या शेतावरच्या झोपडींत आतां मी राहिलों तर ? नागानंद कांही नाहीं राहत तेथें. जेथें नागानंद राहिले तेथें मी राहीन. म्हणजे पुढील जन्मीं तरी मी तुला आवडेन.' तो म्हणाला.
'कसला रे पुढील जन्म ? पुढील जन्माच्या कल्पना दुबळेपणा देतात. 'करीन काय तें याच जन्मी करीन' असे मनुष्यानें म्हणावें. पुनर्जन्म न मानणारे अधिक निश्चयी, अधिक तेजस्वी, अधिक प्रयत्नवादी असतात. त्यांच्या जीवनास एक प्रकारची धार असते. मला नाही पुनर्जन्मवाद आवडत. नागानंद त्याच मताचे आहेत. ह्या कार्यातच पुनर्जन्मवाद बोकाळला आहे. तूं मारीत बस मिटक्या ! त्यांत तुला समाधान असेल तर तें तूं घे. कल्पनेंचें समाधान ! भ्रामक दुबळें समाधान ! ' ती म्हणाली.
'वत्सले, तसे पाहिलें तर सारें काल्पनिकच आहे. आपल्या कल्पनेनेंच आपण सारें उभे करतों. तूं अधिक खेल जाशील तर तें तुला मान्य करावें लागेल.' तो म्हणाला.
'पाण्यांत तळाशीं जाऊं तर चिखल मिळायचा. वरवरच खेळूं.' ती म्हणाली.
'परंतु मोतीं समुद्राच्या तळाशीं असतात.' तो म्हणाला.
'एखादें मोंतीं, परंतु खंडीभर माती.' ती म्हणाली.
'म्हणून तर त्या मोत्याला मोल. नागानंदासारखें सारे असते तर तूं त्यांना मानतेस ना, हृदयाशीं धरतेस ना. ते हजारांत, लाखांत एक आहेत. असें तुला वाटतें म्हणून तूं त्यांना किंमत देतेस.' तो म्हणाला.