आस्तिक थांबले. एक हरण आलें व त्यांचें अंग चाटूं लागलें. शिंगांनी आस्तिकांना कांडुळूं लागलें. प्राणिमात्रावर प्रेम करणा-या त्या महर्षींबद्दलची कृतज्ञता का तें हरिण प्रकट करीत होतें ?

सायंकाळ होत आली. सायंप्रार्थना व सायंसंध्येचा समय झाला. सभा समाप्त झाली. सारें मुके होते, गंभीर होतो. रात्री फलहार झाला. सर्वांनी विश्रांती घेतली. सकाळीं राजा परीक्षिति ऋषींसह निघून गेला.

'राजा, परिस्थिति कठीण आहे. तूं दक्ष राहा. मोठी दृष्टि घें. मी तुला काय सांगू ? तूं समयज्ञ आहेत.' आस्तिक निरोप देतांना म्हणाले.

'भगवन्, तुमचा आशीर्वाद हीच माझी शक्ति. अलीकडे माझी संकल्प-शक्ति नष्ट होत चालली आहे. काय होईल तें खरें. माझ्या हातून पाप होण्यापूर्वीच माझे डोळें मिटोत. माझ्या राज्यांत प्रक्षोभ होण्यापूर्वीच माझे प्राण जावोत.' परीक्षिति म्हणाला.

'चिरंजीव हो तूं. तूं गेलास तर पुढें फारच कठिण काळ येईल असें वाटतें; तूं आहेस तोंच हे प्रश्न मिटले तर मिटतील--' आस्तिक चिंतेनें म्हणाले.

'सत्य स्वत:ची काळजी घेईल.' परीक्षिति म्हणाला.

इतक्यांत नागेशनें रसाळ फळांची एक करंडी भरून आणली. त्यानें ती आस्तिकांजवळ दिली.

'राजा, हीं रसाळ फळें ने; आश्रमाची भेट. ह्या करंडींतून आश्रमाचें ध्येय तुझ्याबरोबर आम्ही देत आहोंत. हा नागेश नागजातीचा तरुण आहे. परंतु त्याला हें सुचलें. काल तूं फळांविषयीं म्हणाला होतास. परंतु ह्याच्या लक्षांत राहिलें. गोड आहे हा मुलगा. त्याचें शरीर मोठें आहे, तसेच मनहि मोठें आहे. मोठा कलावान् आहे तो. सुंदर फुलांच्या माळी करील, पल्लवांची  तोरणें करील, बांबूंचीं विंझणें करील,बांस-या करील --' आस्तिक सांगत होते.

'त्याला पाहून मलाहि आनंद झाला होता. कोणाचेंहि लक्ष त्याच्याकडे जाईल असाच तो आहे.' परीक्षिति म्हणाला.

'परंतु त्याला झोंप पुष्कळ येतें.' हंसून आस्तिक म्हणाले.

'निर्मळ मन आहे म्हणून.' परीक्षिति म्हणाला.

सर्व पाहुणे गेले. सर्व छात्र आपापल्या कामाला लागले. भगवान् आस्तिक एवढेच विचार करीत होते. काय चाललें होतें त्यांच्या मनांत ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel