'माझ्या आईची शपथ, माझ्या प्राणांची शपथ. जाऊं नका.' वत्सला म्हणाली. तिघें परतली.
'थांबा, तुमचा मी हात धरतें. पडाल हों.' वत्सला म्हणाली.
'तिनें एका हातानें नागानंदाचा हात धरला व दुस-या हातानें कार्तिकाचा धरला.
'तुम्ही दोघें दोहों बाजूंस मला नका ओढूं. मी तुम्हाला ओढून नेतें. तुम्ही मुकाटयानें या. तुम्ही माझ्या ताब्यांत. जणूं चोर पकडले दोघें !' ती हंसून म्हणाली.
'चोर पळूं बघतो. मुकाटयाने येत नाही.' नागानंद म्हणाला.
'सैल सोडलें तर पळूं बघतो. घट्ट बांधून नेलें तर मग गडबड करीत नाहीं. कार्तिक पुरा कैदी झाला आहे. त्याला धरलें नाहीं तरी नीट पाठोपाठ येईल, बरोबर येईल. तुम्हांलाच घट्ट धरून नेतें. तुमचें दोन्हीं हात पकडून धरून नेतें.' ती म्हणाली.
'स्त्रियांच्या एका हातांत पुरुषांचे दोन हात पकडण्याची का शक्ति असते ?' हंसत नागानंदानें विचारिलें.
'असते. एखादें सुकुमार फूल महान् नागाला गुंगवून टाकतें. त्या लहानशा फुलाच्या सुगंधांत सापाची महान् फणा खालीं वांकविण्याची शक्ति असते. तुम्ही तर पाहिला असेल हा प्रकार.' तिनें हात आवळून म्हटलें.
'पाहिला आहे. आतां अनुभवीतहि आहें.' तो म्हणाला.
'कार्तिक कोठे आहें कार्तिक ? गेला वाटतें ? तो वडिलांना फार भितो. मला नाहीं भित्रीं माणसें आवडत. मला आगीशीं खेळणारीं माणसें आवडतात. आज नदीला पाणी चढत होतें. मी कार्तिकला हांक मारीत होतें. मरणाशीं खेळलों असतो. नदीच्या जबडयांत शिरलों असतों व बाहेर आलों असतों. परंतु कार्ति कचरला. तुम्ही कशी घेतलीत उडी, फेंकलेंत जीवन ! जीवन कुरवाळणारा मला नाहीं आवडत.' ती म्हणाली.
'परंतु माझा हात तर कुरवाळीत आहेस.' तो म्हणाला.
'बोलण्यांत विसरलें. आतां पकडते घट्ट. नाग असे घट्ट विळखें घालती कीं मग तोडून काढावा लागतो. तशी माझी ही पकड कोण सोडवतो बघूं. वत्सलेची वज्राची पकड असते.' ती म्हणाली.
दोघें घरीं आली. सुश्रुता अंगणांत बसली होती.