त्या सैन्याचा नायक पुढें आला. त्यानें विचारलें, ' तुम्हाला काय पाहिजे ?'
वत्सला म्हणाली, 'आम्हांला विवेक हवा. माणुसकी हवी. आम्ही स्त्रिया अधर्म होऊं देणार नाहीं. पुरुषांना सत्पथ दिसत नसेल तर आम्ही दाखवूं. आम्ही घरीं दिवा लावतों. आज बाहेर लावीत आहोत. दिवा लावणें हे स्त्रियांचे काम. तुम्ही सारें अंधारात वावरत आहांत. तुम्ही कोठें चाललांत ? जनमेजयाला मदत करायला ? त्याच्या बाजूनें उभें राहून नागांशी लढाई करायला ? इंद्रासारख्या थोरांशी युध्द करायला ? तुम्हाला मरायला जायचें असेल तर आधीं आम्हांला मारा. या सैन्यातील सैनिकांना युध्दार्थ जाण्याची खात्रीनें इच्छा नाहीं. आमच्या पतींना, आमच्या मुलांना, आमच्या भावांना विनाकारण समरभूमीवर तुम्ही कां घेऊन जातां ? कुरुक्षेत्रावर काय झालें ? अठरा अक्षौहिणींतील सात राहिले. परंतु लाखों स्त्रिया निराधार झाल्या. तें का पुन्हां करणार ? या सैनिकांच्या मनांत कोणाविषयींहि द्वेष नाहीं. नागजातींत यांचे मित्र असतील, आप्त असतील. नाग लोक वाईट नाहींत. आम्हां स्त्रियांत अनेकींचे पति नाग आहेत. अनेकींच्या सुना नागजातीच्या आहेत. नागलोक थोर आहेत. परवां आमच्यां गांवी जनमेजयाचे अधिकारी आम्हांस जाळण्याची भीति दाखवूं लागतांच आमच्यांतील एका शूर नागकन्येनें हातांत हंसत निखारे घेतलें व ती म्हणाली, 'स्त्रियांना सती जाण्याची संवय आहे. त्यांना अग्नीचें भय नाहीं. अग्नी त्यांचा घरोब्याचा मित्र आहे.' ही पाहा ती शूर स्त्री तिचें लग्न होऊन दहा दिवसहि झाले नाहींत. एका आर्य तरुणांशी तिनें लग्न लाविलें. आतां यांना का जाळणार ? कोणते पाप केलें यांनी ? काळे नि गोरे रंग घेऊन काय बसलांत ? काळया रात्रीचे चंद्राशी लग्न लागत असतें. हजारों नक्षत्रांच्या अक्षता त्या वेळेस त्यांच्यावरून ओवाळून टाकतात. काळा रंग का वाईट ? काळया लाटांच्या डोक्यांवर पांढरी फेसांची फुलें उधळलीं जात असतात. वेद सांगतो 'अंतर्मुख हो.' काळे असोत, गोरे असोत. काळीं करवंदे का कडू असतात ? ती रानचीं करवंदे किती रसाळ व मधुर असतात. ती काळीं म्हणून फेंकाल तर मूर्ख ठराल. या काळया नागकन्या म्हणजे मंजुळ मैना आहेत. काळया कोकिळा आहेत. प्रेमाचे संगीत त्यांनीच ऐकवावें, त्यागाच्या श्रुति त्यांनीच जगाला द्याव्या. तुम्ही जनमेजयाच्या साहाय्यास जात आहांत. मग आम्हांला आधीं करा. आम्ही अपराधीं आहोंत. आम्ही नागांना प्रेम देतों. आम्ही त्यांना तुच्छ मानीत नाहीं. आम्ही त्यांना घरांत घेतों. एकरूप मानतों. आम्ही जनमेजयाच्या आज्ञा मोडल्या आहेत. मारा आम्हांला. काय रे, सैनिकांनो ? तुम्ही कां जाता लढाईला ? तुमचे काय आहे त्यांत हित ? त्यांत आहे का धर्म, आहे का न्याय ? राजा हांक मारतो, चाललांत. मनुष्यानें सदसद्विवेकबुध्दि विकूं नयें. राजा आपणांस अंध करूं लागला तर आपण होऊ नयें. बुध्दीचा डोळा बंद करणें हें सर्वांत मोठे पाप आहे. आपण आर्य वेदधर्म मानतों. वेदधर्म म्हणजे विचारधर्म, गायत्री मंत्र 'बुध्दि तेजस्वी ठेव' असे सांगतो. तुम्ही विचार केलात का ? अविचाराने घाव घालूं नका. तुम्ही म्हणाल, ' राजा पैसे देतो. आम्ही अर्थाचे दास. ' परंतु राजाने कोठून आणला पैसा ? आमच्या धान्यांतील तो धान्य घेतो. आमच्या गुरांतून तो गुरें घेतो. लक्षावधि राजांचे तें गोधन असतें. परंतु तें कोठून आले ? त्या आम्हींच दिल्या गाई. आम्हींच भरलीं राजाचीं कोठारें. त्यांतून तुम्हांला मिळतें. हजारों लाखों नाग आर्यापेक्षांहि अधिक श्रम करतात. त्या श्रमांतून तुम्हाला धनधान्य मिळतें. त्यांच्यावर का तुम्ही प्रहार करणार ? हा अधर्म आहे, ही कृतघ्नता आहे. प्रजेचे न ऐकतां एका राजाचें ऐकणें हा मूर्खपणा आहे. राजा प्रजेचें ऐकत नसेल तर तो राजाच नव्हें, तो एक लुटारू चोर आहे. त्याची आज्ञा ऐकणें म्हणजे चोराला साहाय्य करणें. हा का आर्यधर्म ? गांवोगांव जाऊन पाहा. गांवोगांव आर्य व नाग यांचे संबंध प्रेमाचे आहेत. एका दोल्यावर आर्य व नाग मुलें झोंके घेत आहेत व आकाशाला हाल लावीत आहेत. एकत्र खेळत आहेत, एका नदीमध्यें डुंबत आहेत, एकत्र उठत आहेत, बसत आहेत. परंतु काहीं मोठयांच्या मनांत आला द्वेष, बसली अढी. ह्या मोठयांचा होतो खेळ, लहानांचा जातो जीव ! जनमेजयाला म्हणे नागांचे वावडें ! त्या वक्रतुंडाचें म्हणे नाग दिसतांच वांकडें होतें तोंङ निघून जा म्हणावे दुनियेंतून. या भूमीत राहूं नका. या भूमींत आम्ही राहणार, परस्परांस प्रेम देणार. काय रे सैनिकांनो ? बोला ना ! आहे का तुमच्या मनांत नागांचा द्वेष ? सांगा ('नाही, नाही' म्हणतात.) नाहीं तर मग कोठें जाता ? अनाथांचे रक्षण करणें हा क्षात्रधर्म. आज नाग अनाथ आहेत. त्यांच्या बाजूनें उभें राहा. जा इंद्राच्या झेडयाखाली. त्याने नागांना संरक्षण दिलें आहे. सत्याची तुम्ही बाजू घ्या. ख-या धर्माचा पक्ष घ्या. सत्य हा आपला राजा. ना जनमेजय, ना कोणी. जा माघारे सत्यधर्माचे सैनिक बना. असत्याकडें जायचे असेल तर आमचे मुडदे पाडून जा. या आम्ही उभ्या आहोंत तुमच्या मायबहिणी. चालवा तुमच्या असिलता, मारा बाण. फेंका शक्ति ! आमचें बलिदान होवों.'