'जाऊं मी ? ' आईने विचारिलें.
'जा.' दोघें म्हणाली.
माता निघून गेली. गांवांतील सारी नागमंडळी रात्रीं पसार झालीं. गांवांत रात्रभर कोणाला झोंप आली नाही. कार्तिकाच्या घरीं त्यांचे आईबाप अस्वस्थ होते. उद्यां काय होणार याची सर्वांना चिंता वाटत होती.
दुसरा दिवस उजाडला. गांवांत राजपुरुष आले. त्यांच्याबरोबर सैनिक होते. गांवातील सर्व स्त्री-पुरुषांस सभेला बोलवण्यांत आले. 'कोणीहि घरीं राहतां कामा नये. राहील तर त्याचा शिरच्छेद होईल' अशी दवंडी देण्यांत आली. राजपुरुष उच्चासनावर बसलें. गांवातील सर्व स्त्री-पुरुष जमा झाले. मुलेंबाळें आलीं.
मुख्य राजपुरुष बोलूं लागला, 'तुमच्य गांवांतील सर्व नागलोकांस बध्द करण्यासाठीं मी आलों आहें. सशस्त्र सैनिकांसह आलों आहे. महाराजाधिराज जनमेजयमहाराज यांचें आज्ञापत्र तुम्हाला माहितच आहे. कालचे तुमच्या गांवातून नागमंडळी निघून गेली. त्यांना विरोध करणें येथींल आर्यांचे काम होतें. एकहि नाग बाहेर जाऊं देता कामा नयें, अशी राजाज्ञा आहे. वास्तविक हा सर्व गांव अपराधी आहे. येथील सर्वांनाच राजबंदी करून नेले पाहिजे. परंतु मी गोष्टी इतक्या थराला नेऊं इच्छीत नाहीं. कोणी नाग येथें उरला असेल तर त्यानें निमूटपणें स्वाधीन व्हावें. नाग कोठें आहे, हें कोणाला माहीत असेल तर तयानें तें सांगावें. वेळ नाहीं. काम झटपट उरकावयाचें आहे.'
सभा स्तब्ध होती. कोणी उठेना, बोलेना.
राजपुरुष संतापला. 'काय ? येथें कोणीच नाग नाहीं ? निर्नाग आहे हें गाव ? '
पुन्हां सारे शांत.
राजपुरुषाचा क्रोध अनावर झाला. तो म्हणाला, 'या सर्व गांवाल आग लावून पेटवून टाकतों. आणा रें तें जळजळींत कोलित. हें पाहा जळजळीत पेटतें कोलित. ही निशाणी, ही खूण. नागांना आधार देणारी गांवे आम्ही भस्म करूं. तुमचा गांव सुरक्षित राहावयास पाहिजे असेल तर नाग आमच्या स्वाधीन करा. त्यांची जनमेजयमहाराज तिकडे करतील होळी. त्यांनी सर्पपूजकांचे हवन आरंभिलें आहे. तुमच्या गांवाचे हवन व्हावयास नको असेल तर त्या हवनास बळी द्या, आहुति द्या.'
तेजस्वी कृष्णी राजपुरुषाकडे जाऊं लागली. सर्वांचे डोळे तिच्याकडे वळले तिच्या डोळयांत निर्भयता होती. ती तेथें उभी राहिली. क्षणभर तिनें सर्वांकडे पाहिलें. ती बोलू लागली.