'मग मी काय करूं ? तो कार्तिक आहे. चांगला आहे. सौम्य वृत्तीचा व प्रेमळ दिसला. कार्तिक का वाईट आहे ?' त्यानें विचारलें.
'कार्तिक वाईट नाहीं, श्रावण वाईट नाहीं, माघ वाईट नाहीं, फाल्गुन वाईट नाहीं ? सारे चांगलेच. परंतु कोकिळेला वसंतांतच वाचा फुटते. तुम्हांला सांगूं का ? आर्यकन्या आतां बंड करणार आहेत. आम्ही नागांजवळ विवाह केले म्हणून जर आर्यपुरुष उठतील, तर उठूं देत. त्या कुरुभूमीवरील युध्दांपासून आर्यांत कुमारांची वाण पडली आहे. मुली पुष्कळ व मुलगे थोडें. ह्या मुलींची काय व्यवस्था लावायची ? माझ्या आजीला विचारा. त्या काळीं तर शेंकडों आर्यकन्यांनी नागांना वरिलें. म्हणून तर तो वृध्द वक्रतुंड तडफडत आहे. तुम्हीं ऐकलें असेल त्याचें नांव. मी ज्या आश्रमांत होतें, तेथें तो आला होता, नागद्वेषाचें उपनिषद् घेऊन. मीच त्याला वादांत गप्प बसविलें, तर तणतणत निघून गेला. गुरुदेवांनी माझें कौतुक केलें. ह्या हजारों आर्यकन्यांची संतति का द्वेष्य मानायची ? आम्ही स्त्रिया दूर राहणा-या सृष्टीला जवळ आणूं. त्या वक्रतुंडाच्या विरुध्द प्रचार करण्यासाठीं शेंकडों आर्यमाता निघणार आहेत. पोटच्या पोरांची कापाकापी का मातांना पाहवेल ? माता व भगिनीच निश्चय करतील तर जगांतील द्वेष शमवितील. नागानंद, आपण या द्वेषाविरुध्द मोहीम काढण्याची प्रतिज्ञा घेऊं या. हातांत हांत घेऊं व प्रेमाचा भारतभूमीवर पाऊस पाडूं या. आस्तिकांच्या महान् ध्येयाला वाढवूं या. ह्या ध्येयाच्या सेवेंत संकटांशीं टक्कर देऊं, आगींत उडी घेऊं. येतां ? घेतां माझा हात ?' तिनें भावनोत्कट हात पुढें केला.
तो मुका होता. तीहि मुकी राहिली. दोन तारे जणूं भूमीवर उतरले होते व थरथरत होते. भारताचें भवितव्य का ती दोघें बघत होतीं ? महान् ध्येयें मौनांतून निर्माण होतात. अकस्मात् एखादा पर्वत समुद्रांतून मान वर काढतो. अकस्मात. एखादा महान् तेजस्वी तारा नि:स्तब्ध अशा अनंत आकाशांत चमकूं लागतो. अकस्मात् एखादें सुंदर मोतीं गंभीर समुद्रांतून तीरावर येऊन पडतें व चमकतें.
सुश्रुता आजी आली. ती दोघांकडे पाहातच राहिली.
'तुम्ही केव्हां आलांत ? तुमचा ध्यास घेतला होता हिनें ! अगदीं वेडयासारखी झाली होती. हल्लीं तर अंथरुणांत दिवसभर पडून राही. बरें झालें आलांत तें. आतां हिलाहि बरें वाटेल.' सुश्रुता म्हणाली.
'यांना पाहतांच सारी शक्ति आली. सारी रोगराई पळाली. प्रिय मनुष्यांचे दर्शन म्हणजे धन्वंतरीची भेट. आजी हे आले व एकदम धाडकन् दारांत पडले. मी दचकलें. पाहतें तों हे ! मी घाबरलें. त्यांच्या डोळयांना पाणी लावलें. पदरानें वारा घातला. त्यांनी डोळे उघडलें तेव्हा जिवांत जीव आला.' ती म्हणाली.
'माझ्या डोळयांना कोणतें पाणी लावलेंस ?' नागानंदानें विचारिलें.
'खारट पाणी.' ती हंसून म्हणाली.