ते सर्व सैनिक गर्जना करून उठलें. ते माघारें चालले.'आम्ही सत्याला ओळखूं. नाग आमचा भाऊ आहे. आम्हांला हे राजे फसवतात. धूर्त-कपटी राजे. शाबास, स्त्रियांनो ! तुम्ही खरा धर्म दिलांत. ज्ञानाचा दिवा लाविलांत. प्रेमाचा विजय असों. ख-या शांतीचा विजय असो.' अशा गर्जना करीत ते सैनिक मागें वळलें.

ती वार्ता क्षणांत सर्वत्र गेली. ठिकठिकाणी गोळा होणरी सैन्यें पांगली. त्या त्या राजांनाच क्रान्ति होईल अशी भीति वाटू लागली. इंद्र आनंदला. हजारों सैनिक स्वेच्छेने त्याच्याकडे येऊं लागले. जनमेजय काळवंडला. तो चिंताक्रांत झाला.  स्वत:चे साम्राज्यच गडगडणार, गांवोगांव स्वराज्य होणार, असें त्याला वाटूं लागलें.

'राजा, धीर सोडू नको. तो एक तरुण नागानंद व त्याची बायको वत्सला यांनी हा धुमाकूळ मांजविला आहे. त्या दोघांना बध्द करून आणलें तर ही चळवळ थंडावेल. सारें सुरळींत होईल.' वक्रतुड म्हणाला.

'दुस-या स्त्रिया उभ्या राहतील. आणि या आर्य स्त्रियांना का मी छळणार ?  नाग राहिले बाजूला. आर्य मातांवर का मी हत्यार उगारणार ?'  जनमेजयानें विचारिलें.

'राजा, ह्या आर्य स्त्रियाच नव्हेत. ज्यांना नागांविषयी सहानुभूति वाटते त्या नागच समजाव्या. आणि शेवटीं स्त्री काय पुरुष काय ?  अपराध्याला दंड करणें हें तुझें काम. ह्या स्त्रियांना अबला म्हणून सोडून देण्यांत अर्थ नाहीं अबला असत्या तर घरांत बसल्या असत्या. ज्या अर्थी त्या बाहेर पडल्या आहेत, त्या अर्थी त्यांनाही एकच नियम. जो पुरुषांस नियम तोच त्यांना. राजा कारुण्यवृत्ति होऊं नकोस. क्षत्रियाला अनाठायीं करुणा साजत नाहीं.   

कठोर हो. धर्मासाठीं कठोर हो. आर्य धर्म स्वच्छ ठेविला पाहिजे.' वक्रतुंड विष पाजीत होता.

'परंतु आर्य धर्म म्हणजे काय ? '  राजानें विचारलें.

'आर्य धर्म म्हणजे अनार्यांना नष्ट करणें, किंवा त्यांना आर्य धर्माची दीक्षा देणें. त्यांचे वैशिष्टय नष्ट करून आर्यत्व त्यांच्या ठायीं आरोपिणें.' वक्रतुंड म्हणाला.

'परिस्थिति तर बिकट होत चालली.' जनमेजय म्हणाला.

'राजा, मी त्या वत्सलेला व नागानंदास बध्द करून आणतों. त्यांनी चावटपणा मांडला आहे. 'राजा, राजाच नव्हे. तो जनमेजय लुटारू आहे, चोर आहे.' असे सांगतात. जिव्हा कापल्या पाहिजेत. होळींत फेंकले पाहिजे.' वक्रतुंड म्हणाला.

'जा, त्यांना आणा बध्द करून. इतके दिवस संयम राखीत होतो. परंतु माझा संयम यांना दुबळेपणाचे लक्षण वाटत आहे. होळयाच पेटवूं. आणा. आर्य व नाग स्त्रीपुरुष आणा बांधून. माझी आज्ञा मोडणारे सारे अपराधी आणा. आज्ञा मोडणा-या स्वत:च्या मुलासहि हंसध्वज राजानें तप्त तेलांत टाकिलें. कठोर झालेच पाहिजे. जा, वक्रतुंड, आण त्या उध्दटांना मुसक्या बांधून.' जनमेजय रागानें लाल होऊन म्हणाला.

'होय, महाराज. आर्य धर्माचा विजय असो.' असें म्हणून वक्रतुंड निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel