'वत्सलें, हीं घें फुलें. हीं सायंकाळीं फुलतात. कोमल व सुगंधी आहेत. ही फुलें लौकर कोमेजत नाहींत. कोमेजलीं तरी यांचा वास जात नाहींऋ. यांच्या सुकलेल्या पाकळयांचाच अधिक वास येतो. जरा त्यांच्यावर पाणी शिंपडावें की लगेच सर्वत्र पसरतों वास. घे, घे ना.' तो म्हणाला.
ती घेईना. हात पुढें करीना.
'तुझ्या चरणांवर ठेवूं, तुझ्या मस्तकांवर वाहूं ती म्हणाली.' त्यानें सद्गदित होऊन विचारिलें.
तिनें हात पुढे केला. त्यानें तिच्या हातीं तीं फुलें दिलीं. तिनें ती हृदयाशीं धरली.
'वास घेऊन बघ.' तो म्हणाला.
'या फुलांचा केव नाकानें नसतो वास घ्यायचा. या फुलांचा रोमरोमानें वास घ्यायचा असतो.' ती म्हणाली.
'जा आतां.' तो म्हणाला.
'जा तुम्हीं.' ती म्हणाली.
'वत्सले, काय नेतेस बरोबर ? ' त्यानें दुरून विचारिले.
'तुमचें अमर निर्मळ प्रेम, तुमची सुगंधि मूर्ति.' ती वळून म्हणाली.
'तुम्ही काय नेतां बरोबर ?' तिनें दुरून विचारिलें.
'तें मोठयानें सांगूं नये.' तो दुरून म्हणाला.
रात्रीची वेळ झाली. दीड प्रहर रात्र होऊन गेली. चंद्र चांगलाच वर आला होता. पौर्णिमेचा चंद्र. दुधासारख्या प्रकाशांत पृथ्वी न्हाऊन निघाली होती. नागानंद हातांत भाला व तलवार घेऊन छपून बसला होता. ती पाहा वाघाची भयंकर डुरकाळी ऐकूं आली. आंवांतील गाईगुरें हंबरूं लागलीं, थरथरूं लागलीं. नागानंद सावध होऊन बसला.