'छाटून टाकूं जिभा.' अधिकारी म्हणाला.
'आमची जाळूनराख केलीत तरी त्या राखेंतूनहि प्रेमधर्माचा विजय असो हीच गर्जना होईल. ती गर्जना तुमच्या कानांत शिरेल, तुमच्या हृदयांत उठेल. ती गर्जना, तो मंत्र तुम्हांला ऐकल्याशिवाय गत्यंतर नाहीं.' नागानंद म्हणाला.
वक्रतुंड भेसूर हंसला. जनमेजयानें तिरक्या वक्रदृष्टींने पाहिलें.
'आणा त्या दोघांना पुढें.' जनमेजयानें आज्ञापिलें.
वत्सला व नागानंद यांस पुढें आणण्यांत आलें.
'तुम्हीं आर्य दिसतां. अनार्यांशी कां केलांत विवाह ? कस्तुरीनें मातीच्या ढिपळाशीं मिळावें, हे आश्चर्य आहे. पतीला सोडून देण्यास तयार असाल तर तुम्हांला मी सोडतों. आर्यांची हत्या माझ्या हातून शक्य तों होऊं नयें अशी माझी इच्छा आहे. बोला, तुम्ही आहांत तयार ? आर्यधर्माची सेवा करावयास आहांत तयार ? आर्य धर्म निर्मळ ठेवावयास आहांत तयार ? ' जनमेजयानें वत्सलेस विचारिलें.
'मी जगूं इच्छीत नाहीं, मी मरूं इच्छितें. आर्य पुरुषांप्रमाणें मी उल्लू नाहीं, मी आर्य स्त्री आहें. आर्य पुरुषांनी खुशाल नाग स्त्रिया भोगिल्या व त्यांचा त्यागहि केला. असला आर्य धर्म माझानाहीं. तुम्ही आर्य पुरुष स्त्रियांनाकचरा मानीत असाल. परंतु आम्ही आर्य स्त्रिया पुरुषांना कचरा मानीत नाहीं. तुमच्या अर्जुनानें उलूपी, चित्रांगी, यांना रडत ठेविलें. हा तुमचा आर्य धर्म वाटतें ! आर्य पुरुषांचा हा धर्म असेल, आर्य स्त्रियांचा निराळा धर्म आहे. मी या नागानंदांना सोडणार नाहीं. पत्नीला सोडून पति जात असेल, परंतु पतीला सोडून पत्नी जाणार नाहीं. 'आपल्या पतीचा त्याग कर' असें तुला सांगवतें तरी कसें ? सावित्रीची कथा कधीं ऐकली आहेस का ? नदी समुद्राकडेच जाणार. ती का मागें वळेल ? राजा, अधर्म करायला मला कसें सांगतोस ? ही का तुझी संस्कृति ? तुम्ही पुरुष संस्कृति बुडवायला निघालांत; तरी आम्ही स्त्रिया ती बुडूं देणार नाहीं. आणि नागजात का वाईट ? काय आहे त्यांच्यात वाईट ? टाकून जाणा-या आर्यांचे प्रेमस्मरण करीत पतिव्रता राहणा-या त्या नागस्त्रिया, त्यांच्या चरणांचे तीर्थ घे व पवित्र हो. काय आहे तुझ्यात अधिक ? कशाला आर्यांनी तोरा मिरवावा ? ' तिनें तेजस्वी वाणींने विचारलें.
'आम्हीं आर्य कूर सर्पांची पूजा करून द्वेषी होत नाहीं. नाग द्वेषी असतात. माझ्या पित्याला कसें मनांत दंश ठेवून त्या एका नागानें मारलें -तुम्हांला माहीत नाही ? अशीं ही जात. आर्य लोक सूर्याची उपासना करतात. परब्रह्माची प्राप्ति करून घेऊं पाहतात.' जनमेजय म्हणाला.