'आजी, नागानंद केव्हां ग येतील ? येतील का ते परत ? का ते वा-यां- प्रमाणे फिरतच राहतील ? कशाला पाण्यांतून त्यांनी मला काढलें ? आज माशाप्रमाणें मी तडफडत आहें. खरेंच का नाग दुष्ट असतात ? त्यांना दयामाया नसते ? परंतु ते दुष्ट असते तर माझ्यासाठी तें जीव धोक्यांत टाकते ना! त्यांची ती दयाच मला जाळीत आहे. कां गेले ते ? तूं त्यांना कां जाऊं दिलेंस ? मी लौकर उठून बकुळीच्या फुलांचा हार त्यांच्या गळयांत घालावा म्हणून गेलें होतें, तों इकडे ते गेले ! तो पाहा खुंटीवर बकुळीचा हार सुकून गेला. आजी, तुझ्याजवळ सुकलेली अशोकीचीं फुलें व तुझ्या नातीजवह सुकलेली बकुळीचीं फुलें ! सुकलेल्या फुलांवरच आपण जीवनें कंठावयाची का ? तू त्यांना बांधून कां नाही ठेवलेस ? मीं ठेवलें असतें बांधून. माझें सोने ! त्या दिवशी मिळालेले जिवंत सोनें ! काळेंसावळें सुंदर हंसरें सोनें ! तूं दवडलेंस तें, आजी. आता पुन्हां कधी येईल सोन्याचा दिवस ? एकेक क्षण आतां युगाप्रमाणे वाटत आहे ! कोठें जाऊं, कोठें पाहूं ? क्षणभर दिसता, नाहींसा झाला ! नागानंद ! परंतु मला तर दु:ख देत आहेत. त्यांची आठवण विसरतांहि येत नाही. जों जों विसरू बघतें तों तों अधिकच ते माझ्याशी एकरूप होतात. मी आतां स्वत:ला विसरेन, परंतु त्यांना विसरणें शक्य नाहीं. कधी येतील ते ? कां नाहीं येत ? त्यांना का येथें संकोच वाटला ? येथें का त्यांचे मन फुलेना, हृदय डुलेना ? येथें का गुदमरवणारी हवा होती ? मी तर नाहीं करीत नागांचा द्वेष. या गांवांतील माझ्या मैत्रिणीहि नाहीं करीत द्वेष. त्यांनी तर त्यांच्या-वर पुष्पवृष्टि केली; मुलांनी हार घातले. असा गांव कोठें मिळेल त्यांना ? शोधा म्हणावें. सारी नवखंड पृथ्वी शोधा. शोधून शेवटीं येथें याल. माझे मन तुम्हांला खेंचून आणील. जा रे, मना, जा. त्यांना शोध व घेऊन यें. आजी, माझें मन गेलें उडून तर का मी उन्मनी स्थितीत जाईन, समाधींत जाईन ? तूं बोलत नाहींस, आजी, तुझेंहि नाहीं ना माझ्यावर प्रेम ! तुझ्या-वरसुध्दां रागवायचा मला नाहीं ना अधिकार ! मी कोणावर रागावूं, कोणावर लोभावूं ? कोणाशीं रुसूं, होणाशीं हंसूं ? कार्तिकावर मला रागावतां सुध्दां नाही येत. नागानंद आले तर रागावेन त्यांच्यावर लाल डोळयांनी बघेन त्याच्याकडें येऊं देत तर खरे. येतील का ग ते. आजी ? बोल गडे. कांही तरी बोल.' वत्सला आजीच्या गळां पडून म्हणाली.
'वत्सले, मी तरी काय सांगूं ? येथें राहावेंसें वाटते तर तो राहता. बळेंच राहवण्यांत काय अर्थ ? आग्रह करण्यांत काय स्वारस्य ? मीं त्याला जाऊं दिले. त्याला येथें राहणें प्रशस्त नसेल वाटलें. एक तर येथें घरांत पुरुष माणूस कोणी नाहीं. दुसरी गोष्ट म्हणजे तो पडला नाग व आपण पडलों आर्यं. खरें ना ?' आजी म्हणाली.
'आर्य व नाग, नाग व आर्य ! मला काय त्याच्याशीं करायचें आहे ? ' ती चिडून म्हणाली.
'समाजांतील विचारांना भ्यावें लागतें. समाजांतील आंदोलनाची अगदींच उपेक्षा करूंन नाहीं चालत.' सुश्रुता म्हणाली.
'समाजांतील आंदोलनांवर का आमचीं जीवनें लोंबकळत ठेवायचीं ? या आंदोलनाला मग आम्हीहि कलाटणी देऊं. आंदोलन इतरांनी करावें व आम्हीं का मुकाटयानें तें पाहावें, त्याच्याबरोबर खालींवर व्हावें ? आम्हीहि आंदोलन करूं. लाटेवर प्रतिलाट. आंदोलनावर प्रत्यांदोलन. क्रान्तीवर प्रतिक्रान्ति. एका पायरीच्या डोक्यावर दुसरी.' वत्सला म्हणाली.