'माझ्या खरोखर मनांत येतें कीं आपण दोघें हिंडूं. शशांक राहील आश्रमांत. कार्तिक राहील येथें शेतावर. तो आजीला होईल आधार. आणि आपण दोघें जाऊं. गांवोगांव जाऊं. प्रेमधर्माचा प्रसार करूं. नाग व आर्य यांच्यांत स्नेहसंबंध निर्मूं. हें खरें महाकाव्य. असे करतांना आपणांवर संकटें येतील. मरणहि येईल कदाचित् ! परंतु जीवनाच्या महाकाव्यांतील तें शेंवटचें अमर असें गीत होईल. माझ्या मनांत येत असतें. लहानपणीं मी आजीला म्हणत असें, 'आजी, मी परब्रह्माला वाढवणार आहें. वत्सला परब्रह्माची माता होईल. मला होऊं दे परब्रह्माची माता.' प्रेम हेंच परब्रह्म. आर्य व नाग जात यांचे प्रेम. सर्वांतील सुंदरता व मंगलता पाहण्याचें प्रेम.' वत्सला मनांतील म्हणाली.
इतक्यांत 'कुऊं' आवाज येऊं लागला.
'आतां कोठली कोकिळा ? ' नागानंद म्हणाला,
'सारखी ओरडत आहे. छे कोकिळा नाही हीं.' वत्सला म्हणाली.
'आतां मोराचा आवाज. शशांक तर नाहीं आला? मोराचे आवाज तोच असे काढतो.' नागानंद म्हणाला.
वत्सला धांवत गेली. तो झाडाआड लहानगा शशांक !
'अरे लबाडा !' ती म्हणाली.
'कसें आईला आणलेंस ओढून ! ' तो म्हणाला.
'इतक्या उशीरा कशाला आलास ? ' तिनें विचारिलें.
'तुम्ही इतका उशीर झाला तरी येथें कां ? तुम्हांला नाहीं ना उशीर, मग मलाहि नाहीं. काळोख पडला तरी चालेन. मी उचलून घ्यायला नाहीं सांगणार.' तो म्हणाला.
'बाबा, दूध काढलेंत ?' त्यानें विचारिलें.
'नाहीं. आतां काढतों.' पिता म्हणाला.
'मला येथेंच द्या प्यायला.' शशांक म्हणाला.