आस्तिक भावनाभारानें वांकून खांली बसले. जनमेजय उभा राहिला. त्याला प्रथम बोलवेना. मोठया कष्टानें तो बोलूं लागला. 'मला सर्वांनी क्षमा करावी. नागांनी क्षमा करावी. ज्यांना ज्यांना मी शारीरिक वा मानसिक वेदना दिल्या, त्यांच्याजवळ मी क्षमा मागतों. भगवान् आस्तिकांनी सत्पथ दाखविला. या मार्गानें आपण सारें जाऊं या. आजच्या प्रसंगाचें चिरस्मरण राहण्यासाठीं आपण वर्षांतील एक दिवस निश्चित करूं या. आषाढ-श्रावणांत पाऊस फार पडतो. रानावनांत दूर राहणारे सर्प, नाग पाण्यानें बिळें भरली म्हणजे आपल्या आश्रयांस येतात. नागबंधु सर्पांची पूजा करतात. आपण पावसाळयांतील एखादा दिवस नागपूजेसाठीं म्हणून राखूं या. श्रावण शुध्द पंचमीचा दिवस ठरवूं या. कारण त्या दिवशींच मोठी नागयात्रा भरत असते. तोच दिवस हिंदुस्थानभर ठरवूं. त्या दिवशीं आर्य व नाग, सर्वांनीच नागांची पूजा करावी. त्या दिवशींच संपूर्ण अहिंसा पाळूं. कींड-मुंगीला दुखवणार नाहीं, पानफूल तोडणार नाहीं. एक दिवस तरी प्रेमाचें महान् दर्शन.त्या दिवशीं हंसू, खेळूं, नाचूं, झोक्यावर झोके घेऊं, कथागोष्टी सांगूं. तुम्हां सर्वांना आहे का ही सूचना मान्य ?'
सर्व राजांनी संमति दिली. ऋषिमुनींनी संमति दिली. नागजातीतील तो तक्षकवंशीय तरुण म्हणाला, 'आम्हीं सारे विसरून जाऊं. आपण सारे भाऊ भाऊ होऊं.' वत्सला तेथें येऊन म्हणाली, 'मी महाराज जनमेजयांस फार कठोर बोललें, त्यांनी क्षमा करावी.' परंतु जनमेजयच उठून म्हणाला, 'तुम्ही थोर पतिव्रता आहांत. राजाच्या आज्ञेपेक्षां सदसद्विवेकबुध्दीची आज्ञा अधिक थोर असेल, हें तुम्ही निर्भयपणें जगाला दाखवलेंत. राजाची आज्ञा अयोग्य असेल तर ती पायाखालीं तुडविणें हेंच प्रजेचे कर्तव्य. अशानेंच राजा ताळयावर येईल. राजा शुध्दीवर येईल. राजाच्या 'होस हो' म्हणणें हें प्रजेचें काम नाहीं. वत्सलाताई, तुम्हीच सध्दर्म दाखविलांत. त्या सैनिकांनाहि माघारे दवडून नवपंथ दाखविलांत. या मदांधाला क्षमा करा. मीं महान् अपराध केला. मला तुमच्या चरणांवर पडू दे व रडूं दे.'
खरोखरच राजा जनमेजय वत्सलेच्या पायां पडला.'शाबास, शाबास !' सारें म्हणाले. वृध्द सुश्रुता आजी म्हणाली, 'जनमेजय व वत्सला यांचा एका दिवशींचा जन्म आहे. दोघें एका ध्येयाचीं झाली ! ' सोहळा संपला. सर्व भरतखंड भेटलें. एकरूप झालें. आनंदीआनंद झाला.'