आस्तिक आर्यव्रताजवळ गेलें. त्याच्या अंगावरचीं पांघरुणें ते काढूं लागलें. दोन पाघरुणें काढतांच त्या हालचालीनें तो जागा झाला. नंतर आस्तिक नागेशाकडे वळले. त्याच्या अंगावरची सारी पांघरुणें त्यांनी काढली, तरी त्याला जाग आली नाहीं. नागेश, 'नागेश' हळू हांका मारण्यांत आल्या. तरी कांही नाहीं. शेवटी 'नागेश, नागेश' असें मोठयानें म्हणून त्याला हलवल्यावर त्यानें डोळें किलकिले केले. मग गदगदां हलवल्यावर तो उठला.
'आर्यव्रताला लौकर जाग आली व नागेशाला मागून आली, परंतु जाग येतेच. कोणाला आधीं, कोणाला मागून. जसें हे शारीरिक जागृतीचें तसेंच मानसिक व बौध्दिक जागृतीचें. कांहीचें मन कांही गोष्टीत लौकर जागें होतें, कांहींची बुध्दि कांही गोष्टींत लौकर रंगते, परंतु इतर गोष्टींत त्यांची मतें, त्याच्या बुध्दि कधींहि रमणार नाहींत असे नव्हें. मनाची व बुध्दीची अनंत शक्ति आहे. ज्या संबंधांत मन वा बुध्दि जागृत व्हावयास पाहिजे असेल, त्यासंबंधीची मनोबुध्दीवरचीं आवरणें दूर केली पाहिजेत. त्या त्या वेळी मनोबुध्दीला गदगदां हलविलें पाहिजे. तें तें वातावरण सर्वत्र संतत उभे केलें पाहिजे. दुस-यानें जसें व्हावें असें तुम्हांस वाटतें तें वातावरण सर्वत्र पसरा. रोग्याच्या शेजारी दुसरे रोग का उभे करायचे ? रोग्याजवळ फुलें, सुगंध आपण ठेवतों. प्रकाश, आनंद, स्वच्छता ठेवतों. त्याप्रमाणें ज्यांची जीवनें, ज्यांची मनें तुम्हांला रोगट वाटत असतील, त्यांच्या समीप तुमचीं जीवनें सुगंधी, स्वच्छ, प्रकाशमय, आनंदमय, सेवामय अशीं घेऊन जा. गाणा-या गंधर्वाचीं कुत्रींहि गाऊं लागतात ! हें सारें आपल्यावर आहे. आर्यांनी नागांसमोर सेवामय, सहकार्यमय, प्रेममय जीवन उभे करावें. नागांनी आर्यांसमोर उभे करावें. त्या दोन प्रेमळ लाटा एकमेकीत मिसळून जातील. एक नवीन महान् लाट उत्पन्न होईल. ती आणखीं दुसरींत मिसळेल. अशा रीतीनें ह्या भारतांत मानवापेक्षा गोड सिंधु उचंबळवू या. समजलेत ना ? सर्वांवरची आवरणें दूर होतील, पापुद्रे पडतील, कवचें गळतील. आंतील सौंदर्यं सर्वांचे सर्वांस दिसेल, ही दृष्टि घेऊन येथून जा व द्वेषमय दृष्टीनें पाहणारी आसमंतांतली मानवसृष्टि प्रेममय करा. जा आतां. आपापले आवडीचें विषय शिकायला जा. शांतपणें जा. नागेशला चिडवूं नका, नाहीं तर तो मारील हो--' हंसून आस्तिक म्हणाले.
सारे छात्र गेले. आनंदाची, मोकळेपणाची किलबिल सुरू होती. पांखरें पांगली. निरनिराळया ठिकाणी गेलीं. भगवान् आस्तिक कोठें चाललें ? जेथें जेथें छात्र गेले तेथें तेथें जाऊन प्रेमवृष्टि करायला. स्मितमय आशीर्वाद द्यायला !